मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमिना उर्फ लाली हिला २१ कोटी रुपये किंमतीच्या ‘हेरॉईन’ या अंमली पदार्थासह सायन कोळीवाडा म्हाडा चाळी जवळून अटक केली आहे. लाली ही मुंबईतील मोठ्या ड्रग्स डीलरपैकी एक असून, तिच्यावर यापूर्वी अंमली पदार्थ प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.
अमिना उर्फ लाली हमजा शेख (५३) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स डीलर महिलेचे नाव आहे. अमिना ही मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाउंड येथे राहत असून, मुंबईत लहान-मोठ्या ड्रग्स विक्रेत्यांना ती ड्रग्सचा पुरवठा करते, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिका-यांनी दिली.
(हेही वाचाः आर्यनचे ‘खानपान’ कोठडीतच… जामीन अर्ज फेटाळला)
२१ कोटींचे हेरॉईन जप्त
सायन कोळीवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपर युनिटच्या प्रभारी पोलिस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. या महितीच्या आधारे सोमवारी पोलिस पथकाने छापा टाकून, सायन कोळीवाडा येथील म्हाडा चाळ येथे असलेल्या फुटपाथवरुन लालीला ताब्यात घेतले. यावेळी तिच्याजवळून ७ किलो २०० ग्राम हेरॉईन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत २१ कोटी ६० लाख रुपये असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांनी दिली आहे.
कुठून आले होते ड्रग्स?
अमिना उर्फ लाली हिने हे अंमली पदार्थ राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातील एका खेड्यातून दोन ड्रग्स माफियांकडून विकत घेतले होते. तसेच मुंबईत ती हे ड्रग्स विक्रेत्यांना हे ड्रग विकणार होती, अशी माहिती तिच्या चौकशीत समोर आली आहे. ती ज्या ड्रग्स विक्रेत्यांना हा अंमली पदार्थ विकणार होती त्यांची नावे पोलिसांच्या हाती लागली असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
(हेही वाचाः अखेर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ‘करून दाखवले’!)
दोन मोठ्या कारवाया
मुंबईत या महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन मोठ्या कारवाया केल्या असून, यापूर्वी आझाद मैदान युनिटने तब्बल १६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यापाठोपाठ घाटकोपर युनिटने आता २१ कोटी ६० लाख रुपयांच्या ड्रग्ससह लालीला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community