घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३१मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका राखी जाधव यांचा प्रभाग नव्या प्रभाग आरक्षण सोडतीत महिला आरक्षित झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राखी जाधव यांच्यासाठी हा प्रभाग अनुकूल झाला आहे. त्यामुळे पक्षाने राखी जाधव यांना उमेदवारी दिल्यास भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. महिला आरक्षित झाल्याने जाधव यांच्या विरोधात उभे राहायला भाजपच्या दोन आजी माजी नगरसेविकांनी नकार दर्शवल्याने आता भाजपला आता राखी जाधव यांना तोड देणाऱ्या महिला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
( हेही वाचा : ‘आप’ची भिस्त नाराजांवर)
राखी जाधव यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराचा शोध
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत घाटकोपर पूर्व मधील प्रभाग १३१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव या नगरसेवक म्हणून आल्या होत्या. परंतु नवीन प्रभाग रचनेत हा प्रभाग आता १३० झाला असून पूर्वीच्या खुल्या प्रवर्गाऐवजी आता हा नवीन प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांना १२ हजार १२३ मते मिळाली होती, तर भाजपचे भालचंद्र शिरसाट यांना ११ हजार ३७५ मते मिळाली होती. त्यामुळे केवळ ७४८ मतांनी शिरसाट यांचा पराभव पत्कारावा लागला होता. तर शिवसेनेच्या मंगल भानुशाली यांना ४७०१ एवढी मते मिळाली होती.
राखी जाधव यांचा या प्रभागात चांगला प्रभाव
आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास त्यांच्याकडील मतांची संख्या भाजपच्या तुलनेत अधिक होणार आहे. हा मतदार संघ महिला आरक्षित झाल्याने मागील निवडणुकीत आव्हान देणारे भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचा पत्ता कट होणार आहे. त्यांना या मतदार संघात निवडणूक लढवता येणा नाही. त्यामुळे राखी जाधव यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराचा शोध आता भाजपला घ्यावा लागणार आहे. कोविड काळात राखी जाधव यांनी आपल्या प्रभागात चांगल्याप्रकारची कामे केली आहेत. त्यामुळे राखी जाधव यांचा या प्रभागात चांगला प्रभाव आहे.
या प्रभागातून कुणी लढावे यावरून वाद सुरु आहे. भाजपच्या प्रभाग १३०मधून निवडून आलेल्या बिंदू त्रिवेदी आणि माजी नगरसेविका रितू तावडे या दोहोंपैंकी राखी जाधव यांच्यासमोर कुणी उभे राहावे यावरून वाद सुरु आहे. यावरून दोन्ही नगरसेविकांमध्ये वादावादीही झाली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महिला आरक्षित प्रभाग झाल्याने भाजपपुढे आता उमेदवार कोण द्यावा यावरून धावाधाव सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.