शरीरात सापडले सोने…कोण आहेत या गोल्डन वुमन?

प्रत्येक सोन्याच्या पाकिटात २० ग्राम पासून १०० ग्राम पर्यंत सोन्याचे तुकडे होते.

91

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या तीन केनियन महिलांच्या शरीरातील विशिष्ट भागात ड्रग्स ऐवजी गोल्ड(सोनं) सापडले आहे. एनसीबीने या तिघींना ड्रग्स तस्करीच्या संशयावरुन ताब्यात घेतले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांच्याकडे कुठलेही ड्रग्स न सापडल्यामुळे या तिघींना हवाई गुप्तचर विभागाच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती, एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. हवाई गुप्तचर विभागाने या तिघींना आणि त्यांच्याजवळ सापडलेले सोने ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

ड्रग्स तस्करीच्या संशयावरुन केली अटक

मोहम्मद खुरेशी अली (६१), अब्दुल्लाहि अब्दीया अदान (४३) आणि अली सादिया अल्लो (४५) अशी या तिघींची नावे असून, तिघी केनियन नागरिक आहेत. तीन केनियन नागरिक असलेल्या महिला ड्रग्स तस्करी करत असून, त्या मुंबई विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने १७ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर सापळा रचून संशयावरुन या तिघींना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली.

(हेही वाचाः बापरे! पोटातून काढले १० कोटींचे कोकेन कॅप्सूल!)

निघाल्या सोने तस्कर

मात्र तिघींकडे कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ (ड्रग्स) सापडले नाहीत. या तिघींकडे चौकशी सुरु असताना, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जे.जे रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. दरम्यान या तिघींच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान त्यांच्या शरीरातील एका विशिष्ट भागात १३ पाकिटे सापडली. एनसीबीने हे पाकिटे ताब्यात घेऊन उघडली असता, त्यात कोकेनऐवजी सोन्याचे तुकडे सापडल्याने या तिघी ड्रग्स तस्कर नसून सोने तस्कर असल्याचे उघडकीस आले.

९३७.७८ ग्राम सोने

या तिघींनी सोने तस्करी करण्यासाठी शरीराच्या विशिष्ट अवयवचा वापर करुन सुमारे ९३७.७८ ग्राम वजनाची एकूण १३ पाकिटे त्यात दडवून आणली होती. प्रत्येक सोन्याच्या पाकिटात २० ग्राम पासून १०० ग्राम पर्यंत सोन्याचे तुकडे होते, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघी ड्रग्स तस्कर नसून सोन तस्कर असल्याचे कळल्यानंतर, एनसीबीने या तिघींचा ताबा हवाई गुप्तचर विभाग (कस्टम) यांच्याकडे दिला आहे. यापुढील तपास हवाई गुप्तचर विभाग करत आहे.

(हेही वाचाः मुंबईत नायजेरियन टोळी ड्रग्ज व्यवसायातून दिवसाला कमवते इतके कोटी…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.