गोंदियात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने विद्यार्थी बेशुद्ध

गोंदियातून एक संतापजनक घटना घडली असून एका ट्रकमध्ये जनावरांना भरतात तसे शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी ट्रकमध्ये असंख्य विद्यार्थी होते, यापैकी श्वास गुदमरल्याने १२० विद्यार्थी बेशुद्ध पडल्याचे सांगितले जात आहे. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बेशुद्ध विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आले होते. मात्र तेथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा- ‘राष्ट्रीय सिनेमा दिना’नंतरही ‘या’ तारखेपर्यंत स्वस्तात पाहता येणार चित्रपट!)

काय घडला प्रकार

शनिवारी कोयलारी आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासाठी एका ट्रकसारख्या वाहनाची सोय करण्यात आली होती. मात्र मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेत परत येत असताना ट्रकमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने काही विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला.

ट्रकमध्ये कोंबलेले विद्यार्थी हे गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. तिथून परत असताना संबंधित प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. गाडीत श्वास घ्यायला जागा नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी- विद्यार्थींनी बेशुद्ध झाले अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून या संतापजनक प्रकारानंतर गावकऱ्यांकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here