पगारवाढ होणं हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ बऱ्याचदा लवकर होत नसल्याने खासगी कंपनीतील कर्मचारी त्यांची मेहनत सातत्याने सुरू ठेवतात. परंतु आता खासगी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय सांगतो अहवाल?
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटानंतर, भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांच्या पगारात 9.9 टक्के वाढ करू शकतात, जी BRICS देशांमध्ये सर्वाधिक आहे. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांच्यातील तुलनात्मक अभ्यासात जागतिक व्यावसायिक सेवा फर्म एऑनला असे निदर्शनास आले की, भारतातील कर्मचार्यांच्या पगारात सर्वाधिक 9.9 टक्के वाढ अपेक्षित आहे, त्या तुलनेत रशियामध्ये 6.1 टक्के, चीनमध्ये 6.0 टक्के आणि ब्राझीलमध्ये 5 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय हायटेक, आयटी तसेच आयटी आधारित सेवा आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार असल्याची माहिती आहे. मात्र, कंपनीत असणाऱ्या रिक्त पदांवर भरती न कररण्याचे प्रमाणही भारतातच सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी हा दर 21 टक्के होता, जो गेल्या दशकातील सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – एसटी महामंडळात कर्तव्य बजावताना अपंगत्व आले तरी नोकरीची चिंता नाही!)
भारतातील एऑनचे भागीदार आणि सीईओ नितीन सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामारीसारख्या काळात कर्मचार्यांच्या वेतनात वाढ होणे हा स्वागतार्ह उपक्रम आहे. दरम्यान, हा अहवाल तयार करण्यासाठी 40 हून अधिक उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एऑनचे आणखी एक भागीदार रुपंक चौधरी यांच्या मते, कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा सामना करणारे उद्योग जसे की किरकोळ, लॉजिस्टिक, रेस्टॉरंट इत्यादी देखील आधुनिक डिजिटल चॅनेलद्वारे पुन्हा एकदा रुळावर आल्याचे पाहायला मिळत आहे. तरया सर्व उद्योगांनी महागाईचा दबाव आणि कोरोना संसर्गाचा वाढता धोका पगारवाढीच्या मार्गातील अडथळा असल्याचे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community