प्रवास किंवा कामानिमित्त रेल्वेस्थानकावर गेल्यावर भूक लागताच अनेकांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पाच स्थानकांबाहेरील उद्यानात एक कोच ठेवून त्यातच उपाहारगृह (कोच रेस्टॉरंट) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे माफक दरात नाश्त्यासह रुचकर जेवण देखील मिळणार आहे.
या स्थानकांवर होणार प्रयोग
त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असून अमरावती येथे लवकरच कोच रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने निविदा काढली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी या निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच एक प्रवासी डबा स्टेशन समोरील उद्यानाजवळ आणून ठेवला जाईल. त्यात हे रेस्टॉरंट सुरू होईल. रेल्वेतून येणारे-जाणारे प्रवासी व शहरातील नागरिकांना तेथे नाश्ता व जेवणाचा आनंद घेता येईल. ही सुविधा माफक दरात मिळेल. पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात अमरावती, भुसावळ, नाशिक, शेगाव आणि अकोला या स्थानकांवर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
अमरावती – नागपूर इंटरसिटी धावणार
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार, २१ जुलैपासून अमरावती-अजनी (नागपूर) इंटरसिटी एक्स्प्रेस पुन्हा एकदा रुळावर चावणार आहे. कोरोनामुळे ही एक्स्प्रेस २ वर्षे बंद ठेवण्यात आली होती. उद्या, बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता पहिली इंटरसिटी एक्स्प्रेस अजनीहून सुटेल आणि रात्री ९.५० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.
(हेही वाचा- धक्कादायक! इतक्या भारतीयांनी स्विकारलं पाकिस्तानचं नागरिकत्व, केंद्र सरकारने दिली माहिती)
अमरावतीकर चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांसाठी इंटरसिटी ही उपयुक्त गाडी असून पहाटे ५.३० वाजता निघाल्यानंतर ती सकाळी ८.१५ वाजता नागपुरातील अजनी स्थानकावर पोहोचते या इंटरसिटीद्वारे चांदूर रेल्वे, धामणगा रेल्वे, पुलगाव, वर्धा या ठिकाणीही जाणे सोयीचे आहे. तसेच या स्थानकांवरील प्रवाशांनाही नागपूरला जाण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होतो. त्यामुळे इंटरसिटी सर्वांसाठीच उपयोगी एक्स्प्रेस आहे. सातत्याने ती सुरू करण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेने ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीहून सोमवार ते शनिवार अशी ही इंटरसिटी पहाटे ५.३० वाजेपासून धावणार आहे.
Join Our WhatsApp Community