‘ती’ आली आणि त्याला घेऊन गेली! फिल्मसिटीत सापडलेल्या बिबट्याच्या बछड्याची कहाणी

262

गोरेगाव येथील आरे फिल्मसिटीत सोमवारी सापडलेला बिबट्याचा बछडा अखेर त्याच्या आईला  भेटला आहे. बुधवारी सकाळी पावणे चार वाजता त्याची आई जंगलात पिंजऱ्यात ठेवलेल्या बछड्याला घेऊन गेली. बछड्याच्या आईला पाहताच वनाधिका-यांनाही आनंद झाला. गेल्यावर्षी आरेत माणसांवर हल्ला करणा-या हल्लेखोर बिबट्याला पकडताना बछड्याची आई वनविभागाच्या पिंज-यात चुकून अडकली होती. वनाधिका-यांनी तिला सी३३ असे नाव दिले होते. ही सी३३ हल्लेखोर सी३२ मादी बिबट्याची सख्खी बहिण आहे. तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर सी३३ ला पाहून वनाधिका-यांनाही आनंद झाला.

काय आहे घटना

अंदाजे चार आठवड्यांच्या बिबट्याच्या बछड्यावर सोमवारी सकाळी फिल्मसिटी परिसरातील भटकी कुत्री भुंकत होती. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे बछडा भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटला. बछड्याला सुरक्षारक्षकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांच्या हवाली केले. वैद्यकीय तपासणीत बछडा अशक्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला प्राणीरक्षकांनी औषधोपचार आणि अन्न दिले. या घटनाक्रमात तासाभराने बछडा सापडलेल्या ठिकाणी अजून एका बिबट्याचा वावर सुरक्षारक्षकांना दिसला. बिबट्याची आई त्याला घेण्यासाठी आली होती, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी बांधला.

पाहिला प्रयत्न फसला!

सोमवारी रात्री बछडा सापडलेल्या ठिकाणी आईशी बछड्याची भेट घडवून देण्याचा निर्णय वनाधिकाऱ्यांनी घेतला. मोकाट कुत्रे आणि माकड यामुळे आई बछड्याजवळ येऊन निघून गेली. वनाधिकाऱ्यांनी सोमवारी आई-बछड्याचा भेटीचा केलेला प्रयत्न फसला. सी ३३ ला याअगोदरही पिंज-यात पकडले गेल्याचा अनुभव असल्याने तिने सावधानतेनेच पाऊले उचलली होती. मात्र पिंज-याची रचना ओळखीची दिसल्याने तिला आपल्या बछड्याला घेऊन जंगलात जाता आले नाही.

( हेही वाचा: अभियंत्यांच्या मागणीला केराची टोपली: हसनाळे यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी चंदा जाधव यांच्याकडे

योजना बदलली

वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यावेळी छोट्या प्राण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिंजऱ्यात बछड्याला ठेवण्यात आले. आईला पाहताच बछडा आनंदी झाला. पिंजऱ्याचा दरवाजा वनाधिकाऱ्यांनी अलगद खोलताच बछडा बाहेर आला आणि आईजवळ गेला. आपल्या बछड्याला सुखरूप पाहून आई त्याला घेऊन जंगलात निघून गेली. हे दृश्य लांबून पाहून वनाधिकारीही सुखावले.

सी३३ बद्दल…

सी३३ ला गेल्या ऑक्टोबर महिन्यात जेरबंद करण्यात आले होते. कालांतराने ही मादी बिबट्या हल्लेखोर नसून, तिची सख्खी बहिण असल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. तिच्या हालचालींवर देखरेखीसाठी रेडिओ कॉलर करुन तिला सोडले होते. बराच काळ सी ३३ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कृष्णगिरी भागांतच फिरत होती. नंतर ती आरेत परतली. तिचा स्वभाव बहिणीसारखा माणसांवर हल्ले करण्यासारखा नसल्याने कालांतराने तिच्या मानेवरील रेडिओ कॉलरिंग वनाधिका-यांनी काढून टाकले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.