पोलीसच बनले बाळाचे खरेदीदार!

नुकतेच जन्मलेले बाळ विक्रीसाठी ठेवले आहे, अशी माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. बाळाची विक्री करताना रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी स्वतः ग्राहक बनून बाळ खरेदी करण्याचे नाटक करून एक लाख रुपयांत बाळाचा सौदा पक्का करून बाळाची आई आणि दलाल महिलेला रंगेहात अटक केली. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ६च्या पथकाने केलेल्या या कारवाईत स्त्री जातीचे अभ्रक ताब्यात घेऊन दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गोवंडीतील देवनारच्या गायकवाड नगरयेथील एका चाळीत राहणाऱ्या महिलेच्या घरी एक स्त्री जातीचे अभ्रक बाळ विक्री करण्यासाठी आणले आहे. या बाळाची एक लाख रुपयात विक्री करण्यात येणार असून ते ग्राहक शोधत आहेत,अशी माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ चे पोलीस नाईक अंकुश वानखेडे यांना खबऱ्याने दिली. वानखेडे यांनी ही माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना दिली
साळुंखे यांनी कक्ष ६ च्या महिला पोलीस अधिकारी मीरा देशमुख, सपोनि.सचिन गावडे, महिला शिपाई सरोदे यांचे पथक तयार केले व हे बाळ विकत घेण्यासाठी महिला पोलीस शिपाई सरोदे यांना बोगस ग्राहक बनवून बुधवारी पंचासह देवनार येथे गायकवाड नगर येथील चाळीत ज्योती आर मुगम यांच्या घरी पाठवले. ज्योती आर मुगम यांच्यासोबत पूर्वीच बोलणी झाल्याप्रमाणे मुगम हिने पैसे आणले का? अशी विचारणा केली, बोगस ग्राहक बनून गेलेल्या पोलीस शिपाई सरोदे यांनी एक लाख रुपयांचे पाकीट ज्योती मुगमच्या हातात देऊन बाळाची मागणी केली.

( हेही वाचा: MSRTC: शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीसांकडून दिलासा)

ज्योती मुगम हिने आतल्या खोलीतून एक दिवसाचे स्त्री जातीचे अभ्रक कपड्यात गुंडाळलेले बाळाला घेऊन आली व सरोदे यांच्याकडे बाळाला सोपवताच दबा धरून बसलेल्या महिला सपोनि. देशमुख आणि पोलीस पथकाने ज्योती मुगमला बाळाची विक्री करताना रंगेहात पकडून तिच्याकडे चौकशी केली असता हे मुलं पूजा सोनवणे या महिलेचे असून तिच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पूजा सोनवणे ही देखील त्याच परिसरात राहणारी असून पोलीस पथकाने तिला देखील ताब्यात घेऊन दोघींना अटक करून देवनार पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा सोनवणे हिने स्वतःच्या मुलीची विक्री का केली याबाबत तिच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here