राज्यात वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात माणसाचा किंवा जनावराचा मृत्यू झाल्यास वनविभागाकडून नुकसानभरपाई दिली जाते. माणूस किंवा जनावर जखमी झाले तरीही वनविभाग नुकसानभरपाई तातडीने देते. या रक्कमेत वाढ केली जावी, ही प्राणीप्रेमींची मागणी सरकारच्यावतीने मान्य झाली असून, आता वन्यप्राण्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास वनविभागाकडून वीस लाख रुपयांची रक्कम नुकसान भरपाई स्वरुपात दिली जाणार आहे. ही सुधारित नुकसानभरपाई तातडीने दिली जाईल.
नुकसानभरपाईचे स्वरुप बदलले
वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे तसेच हत्तींच्या हल्ल्यात होणा-या नुकसानभरपाईत वाढ केल्याचे वनविभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले. रक्कमेत वाढ झाली असली तरीही आर्थिक साहाय्याच्या तरतुदीत बदल करण्यात आला आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास मृताच्या परिवाराला तातडीने दहा लाखांचा धनादेश दिला जाईल. पूर्वी नुकसानभरपाईची किंमत कमी असल्याने तातडीने दिला जाणारा धनादेश केवळ आठ लाख रुपयांचा होता. आता दहा लाखांचा धनादेश तातडीने दिल्यानंतर उर्वरित दहा लाख कुटुंबीयांना फिक्स डिपॉझिट स्वरुपात दिले जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच लाख पाच वर्षांनी, तर दुस-या टप्प्यातील पाच लाख दहा वर्षांनी दिले जातील.
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात माणसाला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले जातील. हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेल्यास नुकसानभरपाई म्हणून केवळ वीस हजार रुपयांची रक्कम मर्यादित स्वरुपात दिली जाईल. जखमी व्यक्तीचे उपचार सरकारी रुग्णालयात करण्याचा वनविभागाचा आग्रह आहे. सरकारी रुग्णालयातील औषधोपचारांचा खर्च वनविभाग करेल.
जनावर मृत्यू, अपंग किंवा जखमी झाल्यास
- पशुधन – नुकसानभरपाईची रक्कम
- गाय, म्हैस, बैलाचा मृत्यू झाल्यास – बाजार भाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा सत्तर हजारांपेक्षाही कमी रक्कम दिली जाईल.
- मेंढी, बकरी, इतर पशुधन – बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा पंधरा हजारांपेक्षा कमी रक्कम दिली जाईल.
- गाय, म्हैस, बैलाला कायमचे अपंगत्व आल्यास – बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १५ हजारांपेक्षा कमी रक्कम दिली जाईल.
- गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास – उपचार सरकारी रुग्णालयात करणे बंधनकारक राहील. नुकसानभरपाईची रक्कम बाजारभावाच्या २५ टक्के तर प्रत्येक जनावरामागे पाच हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम दिली जाईल. नुकसाईभरपाई जास्त असल्यास पशुवैद्यकीय अधिका-याने दिलेल्या पत्राच्या आधारावर ठरवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.