वृत्तवाहिन्यांच्या चिथावणीखोर बातम्यांबाबत सरकारचा आक्षेप, म्हणाले…

127

माहिती आणि प्रसारण खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत असे आढळून आले आहे की, अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी वृत्तांकनाच्या नावाखाली दाखवलेले प्रसंग हे दिशाभूल करणारे, भावना भडकवणारे असल्याचे, म्हटले आहे. युक्रेन- रशिया युद्ध आणि दिल्लीतील हिंसाचाराचे वृत्तांकन करताना चिथावणीखोर भाषा वापरु नये, असा सल्ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील दूरचित्रवाहिनीवरील खासगी वृत्तवाहिन्यांना दिला आहे.

भाषा असंसदीय, अवमानकारक

वृत्तवाहिन्यांनी वापरलेली भाषा ही सभ्यतेचे किमान निकषसुद्धा पाळत नाही. ती अश्लील आणि बदनामीकारक आहे. यातून केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995 च्या कलम 20 च्या उपकलम 2 मधील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. विशेषत: रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष आणि वायव्य दिल्लीतील विशिष्ट घटना तसेच, काही वाहिन्यांवरील वृत्त चर्चांचा याबाबत दाखला देता येईल. एका वृत्तवाहिनीने 20 एप्रिल रोजी हुंकार या कार्यक्रमात सहभागी करुन घेतलेल्या वक्त्यांची भाषा असंसदीय, अवमानकारक होती.

सरकारचे आक्षेप

  • या वाहिन्यांचे अनेक पत्रकार आणि निवेदक यांनी कपोलकल्पित, बनावट तथ्यांबाबत विधाने करुन लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला.
  • युक्रेन युद्धाबाबत वृत्तवाहिन्या या खोटे दावे करुन आंतरराष्ट्रीय संस्था, अभिनेते यांची वक्तव्ये मोडतोड करुन दाखवत आहेत. तसेच बातमीशी संबंध नसलेली शीर्षके, टॅगलाइन देत आहेत.
  • एका वाहिनीने 18 एप्रिल 2022 रोजी युक्रेन मे अॅटोमा हडकंप अशी बातमी दाखवून रशिया अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.
  • दिल्लीतील हिंसाचाराचे वार्तांकन करताना, एका वाहिनीने दिल्ली मे अमन के दुश्मन कौन असे शीर्षक देत एक व्यक्ती तलवार नाचवत असल्याचे, दृश्य वारंवार दाखवले. ही हिंसा पूर्वनियोजित असल्याचा समज होईल, असे चित्रण यात होते.
  • अणुयुद्धाबाबत रशियाने युक्रेनना 24 तासांचा इशारा दिल्याचे, वृत्त दाखवून एका वाहिनीने लोकांच्या मनात भय निर्माण केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.