लसीकरणाच्या बाबतीत नवनवीन विक्रम करणारा भारत ऑक्टोबरपासून 2021च्या चौथ्या आठवड्यात कोविड-19 लसींची निर्यात पुन्हा एकदा सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सोमवारी केली. यावर्षी एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत लसींच्या पुरवठ्याची गरज लक्षात घेता लसींच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये 30 कोटी लसींचे उत्पादन होणार असल्याचे मांडवीय म्हणाले. त्यामुळे ऑक्टोबरपासून इतर देशांसोबत ‘लस मैत्री’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यात फक्त अतिरिक्त डोस निर्यात केले जाणार असल्याचे मांडवीय यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः लसीकरणात भारताने ‘या’ सात बलाढ्य देशांना टाकले मागे…)
वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय्य
ऑक्टोबरमध्ये 30 कोटींपेक्षा जास्त डोस तयार केले जाणार असून, वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत 100 कोटींपेक्षा जास्त लसींचे उत्पादन अपेक्षित आहे. आतापर्यंत देशातील 61 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करुन भारत वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय्य पूर्ण करेल. यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल. कोविड -19 विरुद्ध सामूहिक लढाईसाठी जगाप्रती असलेली आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी लसींचा अतिरिक्त पुरवठा केला जाईल, असेही मांडवीय म्हणाले.
(हेही वाचाः लसीकरणात भारत बनला महासत्ता!)
भारतीय लसीकरण मोहीम जगभरासाठी आदर्श
सप्टेंबरमध्ये 26 कोटी डोस स्वदेशी लस निर्मात्यांकडून मिळतील. भारतात कोविड लसींचे स्वदेशी संशोधन आणि लशींच्या उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित करताना मांडवीय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच भारत एकाच वेळी जागतिक घडामोडींच्या अनुषंगाने कोविड लसींचे संशोधन, विकास आणि उत्पादन करत आहे. भारताची लसीकरण मोहीम संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे आणि ती मोठ्या वेगाने पुढे जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community