राज्यात वाढत्या कोरोनामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरात अपुरे असलेले बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची कमतरता यावर चर्चा करण्यात आली. सोबतच रेमडेसिवीर औषधांची कमतरता आणि त्याचा काळाबाजार या विषयावर देखील बैठकीत चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं मत सर्वांचं आहे. मात्र अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर प्राण वाचवा, की प्रपंच हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डेथ रेट कमी करण्याचे राज्यासमोर आव्हान
राज्यात कोविडमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा आहे. तसेच त्याचा काळाबाजार देखील होताना पहायला मिळत आहे. तसेच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होत चालला आहे. त्यामुळे इतर राज्यांतून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली असल्याचं, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच डेथ रेट कमी करण्याचे आव्हान राज्यासमोर असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्राथमिकता असून, त्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जाणार आहेत.
(हेही वाचाः महापालिकेची २ लाख रेमडीसीवीर खरेदीची ऑर्डर!)
प्राण वाचवायचा की प्रपंच हा निर्णय घ्यावा लागेल
लॉकडाऊन संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते तसेच टास्क फोर्स या सर्वांशी चर्चा केलेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर, देशभरात परिस्थिती बिकट होत चालली आहे. पंधरा दिवस आधी जी स्थिती होती ती आता राहिलेली नाही, अशी भीती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बोलून दाखवली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून “प्राण वाचावा, की प्रपंच” हे आता आपल्याला ठरवावे लागेल, असंही ते यावेळी म्हणाले. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असे संकेत त्यांनी दिले. अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठकीत राज्यामध्ये सध्या अपूर्ण असलेले व्हेंटिलेटर, कमी पडत असलेले रेमडेसिवीर औषध आणि ऑक्सिजन याबाबत या बैठकीत चर्चा झाली असून, यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.
सध्या राज्यात उपलब्ध असलेल्या बेडची संख्या
४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले तर, १ हजार ९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढत आहे. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करत आहोत तितका हा दर वाढतो आहे. ११ एप्रिल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या, यात १ लाख अॅन्टिजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्सपैकी ७५ टक्के भरले असून, ६७ हजार ऑक्सिजन बेड्सपैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यांत बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करुन रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था करण्यात आली आहे.
(हेही वाचाः नेस्को संकुलात आणखी 1500 खाटांची सुविधा!)
Join Our WhatsApp Community