प्रभाग रचनेच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही! अशी असणार पालिका निवडणुकांची रचना

हिवाळी अधिवेशनात हा अध्यादेश दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल.

155

महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949च्या सुधारणा अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली असून, सदर अध्यादेश ३० सप्टेंबर रोजी प्रख्यापित झाला आहे. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका या तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडणार आहेत.

राज्य मंत्रीमंडळाने हा अध्यादेश २८ सप्टेंबर रोजी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेची सुधारणा आहे. काँग्रेसने एक सदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी केली होती. २०१९ च्या सुधारणा अधिनियमांद्वारे महापालिकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती.

(हेही वाचाः महापालिका निवडणूक : प्रभाग रचनेच्या कच्चा आराखडा बनवण्याच्या कामाला सुरुवात)

पालिका प्रशासनांची मेहनत पाण्यात

सध्या महापालिका प्रशासन एक सदस्य प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पालिका कामाला लागल्या आहेत. आता सुधारणा अधिनियम प्रख्यापित झाल्याने पालिका प्रशासनांची तयारी पाण्यात गेली आहे. यामुळे पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचे प्रारुप पालिका प्रशासनांना तयार करावे लागणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात २०१७ मध्ये महापालिका निवडणुका ४ सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे पार पडल्या होत्या.

आधी मतभेद आता शिक्कामोर्तब

आगामी काळात राज्यात १८ महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत आघाडी सरकारच्या घटक पक्षांत तीव्र मतभेद होते. मात्र आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाले आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा अध्यादेश दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल.

(हेही वाचाः ‘फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा…’ दानवेंनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘त्या’ विधानाची आठवण)

काय आहे कारण?

महापालिका निवडणुकांत एक सदस्यीय प्रभाग रचना होती, मात्र सध्या कोविडची परस्थिती पाहता आणि महापालिका प्रशासनांना कामकाज प्रभावी व सुरळीत करता यावे, यासाठी प्रभाग सदस्य पद्धतीत बदल करण्यात येत आहे, असे कारण नगर विकास विभागाने अध्यादेशामध्ये नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.