ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – दसरा मेळाव्यात आवाज वाढला कोणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा?)
विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community