महिला दिनानिमित्त राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार; गेट वे ऑफ इंडियाला भव्य कार्यक्रम

राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या दिवशी गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोढा म्हणाले, स्वातंत्र्य्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टीमिडीया लाईट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र

मुंबई उपनगरामध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र, तसेच फिरते स्वच्छता गृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी.एन.दास, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्जला दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here