राज्यात सोलापूरातील माळढोक अभयारण्यात आठवड्याच्या शेवटी पक्षीप्रेमींना सुखद धक्का बसला. तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माळढोक अभयारण्यात माळढोक पक्ष्याचे दर्शन झाले. राज्यात आता केवळ एकच माळढोक पक्षी उरलेला असताना वनविभागानेही या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी खास टीम तयार करुन लक्ष ठेवले आहे.
(हेही वाचा – ‘जरा Sensible माणसाबद्दल विचारा’, फडणवीसांचा राऊतांना सणसणीत टोला)
गवताळ प्रदेशाचा -हास तसेच मानवी हस्तक्षेपामुळे राज्यात आता केवळ एकच माळढोक पक्षी उरला आहे. जागतिक पातळीवरही माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राज्यात सोलापूरमधील माळढोक अभयारण्यासह विदर्भातही माळढोक पक्षी दिसून येत होते. परंतु दहा वर्षांपूर्वी माळढोक पक्ष्यांची संख्या राज्यभरात फारच खालावली.
माळढोकला वाचवण्यात वनविभागाला अपयश
विविध उपाययोजना करुनही माळढोक पक्ष्याला वाचवण्यात वनविभागाला अपयश आले. तूर्तास गुरुवारपासून माळढोक अभयारण्यात मादी माळढोक पक्ष्याचे दर्शन होऊ लागल्याची माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली. ही मादी माळढोक पक्षी कर्नाटक आणि राज्यात फिरत राहते. सध्या माळढोक पक्ष्याचा विणीचा हंगाम सुरु असल्याने सप्टेंबर महिन्यापर्यंत ही मादी माळढोक पक्षी इथेच वास्तव्य करेल, असा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला.
याअगोदर ही मादी माळढोक पक्षी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महिन्याभराच्या विश्रांतीसाठी माळढोक अभयारण्यात आली होती. विणीचा हंगाम सुरु असल्याने मादी माळढोक पाठोपाठ नर माळढोक पक्षीही अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली. या पक्ष्यांची अंडी वाचवण्यासाठी तसेच पक्ष्यांना कोणताही मानवी उपद्रवामुळे त्रास होणार नाही, याकरिता वनविभागाची टीमही कार्यरत असल्याचे चव्हाण म्हणाले