यंदा दिवाळीत बाजारात उपलब्ध हरित फटाक्यांनी आवाजाची मर्यादा पाळल्याचे सकारात्मक चित्र गुरुवारी तज्ज्ञांच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणा-या आवाज फाऊंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेने फटाक्यांच्या आवाजांची तपासणी केली. १६ फटाक्यांमध्ये नियमानुसार आवाजाची मर्यादा आढळून आल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. गेल्या १४ वर्षांच्या वार्षिक तपासणीत पहिल्यांदाच आवाजाची मर्यादा फटाके बनवणा-या कंपन्या पाळत असल्याचे दिसून आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार हरित फटाक्यांवर क्यूआर कोडचे लावावे हे बंधन फटाक्यांची निर्मिती करणा-या काही कंपन्या पाळत नसल्याचेही पहायला मिळाले.
चेंबूर येथील आरसीएफ मैदानात २२ फटाक्यांच्या आवाजाच्या मर्यादेची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी केली. २२ फटाक्यांपैकी १६ फटाके फोडताच आवाज करणारे होते. सनी फायरवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या झिरो अवर फटाका फोडताच ११४ डेसिबल आवाजाची मर्यादा नोंदवली गेली. त्यासह राजूकन्नाज कंपनीच्या क्लासिक बॉम्ब ग्रीन फटाक्याची आवाजाची मर्यादाही ११४ डेसिबलपर्यंत पोहोचली. ब्लॉक बस्टर ६० मल्टी कॉ. कंपनीच्या ब्लॉक बस्टर ६० मल्टी नामक फटाक्यामुळे ११२.६ डेसिबलपर्यंत आवाज पोहोचला.
राजू कन्ना फायरवर्क फॅक्टरी कंपनीच्या डबल धमाका फटाक्यामुळे ११०.९ डेसिबल आवाजाच्या मर्यादेची नोंद झाली. परंतु या उत्पादनावर क्यूआर कोड नव्हता. तेज फायरवर्क्सच्या कमांडो उत्पादनात ११०.९ डेसिबल आवाजाची मर्यादा नोंदवली गेली. राजू कन्ना फायरवर्क फॅक्टरीच्या डबल धमाका फटाक्याने ११०.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली. मनोज फायर वर्क्स कंपनीच्या रेनबॉ १२० मल्टि कोलॉ फटाक्यामुळे ११०.१ डेसिबल आवाजाची मर्यादा आढळली परंतु क्यू आर कोड उत्पादनांवर छापलेला नव्हता.
१०० डेसिबलहून पुढे आवाजाची मर्यादा ओलांडलेल्या फटाक्यांच्या यादीत मनोज फायर वर्कचे युनिव्हर्सल हिरो फटाक्यामुळे १०९.४ डेसिबल तर राजू कन्ना फायरवर्क्स फॅक्टरीच्या इंडिया नामक फटाका फोडताच १०७.८ डेसिबलचा आवाज झाला. सोनल फायरवर्क फॅक्टरीच्या फटाक्यामुळे १०४.५ डेसिबल आवाजाची मर्यादा नोंदवली गेली. इतर जमीनचक्र तसेच पाऊस आदी फटाक्यांमधील आवाजाची मर्यादा १०० डेसिबलहून खाली नोंदवली गेली.
क्यूआर कोड नसलेली उत्पादने
- मनोज फायरवर्क्स – रेनबो १२० मल्टि कलर
- राजू कन्ना फायरवर्क फॅक्टरी – डबल धमाका
- मनोज फायरवर्क्स – युनिव्हर्सल हिरो
- श्री पद्मावती पायरोटॅक – टीम टीम डेल्यूक्स फ्लॉवर
- स्टॅण्डर्ड फायरवर्क्स – डॉलर व्हिल
- महालक्ष्मी चंद्रा – इलेक्ट्रीक नावाची सुरसुरी
- जय साई बाबा – साई बाबा सुरसुरी
- सोनल फायरवर्क्स फॅक्टरी – मर्क्युरी अचिलिस
- ब्लॉक बस्टर ६० मल्टी कॉ फटाका
दहा हजारांची माळ फोडल्यानंतर किमान दहा मिनिटांहून अधिक काळ माळ फुटल्याचा आवाज झाला परंतु इतका वेळ फुटत असतानाही आवाजाची मर्यादा पाळली गेली, हे आश्चर्यजनक आहे. पहिल्यांदाच एवढ्या वर्षांत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राखून दिलेले नियम फटाक्यांमध्ये पाळले गेल्याचे आम्हांला दिसले. मात्र प्रत्येक फटाक्यांवर क्यू आर कोड नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे. त्यावर अपेक्षित कारवाई होणे गरजेचे आहे.
सुमैरा अब्दुलली, संस्थापक, आवाज फाऊंडेशन
Join Our WhatsApp Communityफटाक्यांमध्ये १२६ डेसिबलपर्यंत मर्यादित आवाज अपेक्षित असतो. यंदा सर्वच फटाक्यांच्या उत्पादनामध्ये आवाजाची मर्यादा पाळली गेल्याचे दिसले. फटाक्यांच्या वापराबाबत लोकांमध्ये ब-याच प्रमाणात जनजागृती झाली आहे.
संजय भोसले, प्रादेशिक अधिकारी, मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ