सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ‘या’ संकटग्रस्त कासवानं घरटं बांधल्याची पहिल्यांदाच झालीय नोंद…

196

सिंधुदुर्गातील देवबाग किनारपट्टीवर खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रीन सी टर्टल या संकटग्रस्त कासवाच्या प्रजातीचे घरटे आढळून आले आहे. स्थानिक मच्छिमाराला ग्री सी टर्टल ही कासवाची प्रजाती किना-यावर आढळली. ग्रीन सी टर्टल कोकण किनारपट्टीच्या समुद्रात आढळतात. परंतु किनारपट्टीला भेट देऊन घरटे बांधण्याच्या या दुर्मिळ घटनेने वन्य जीवप्रेमी सुखावले. किनारपट्टीवर मानवी हस्तक्षेप कमी होत असल्याने ग्रीन सी टर्टल कासवाने घरटे बांधल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

५५ ते ६० दिवसांत ग्रीन सी टर्टल प्रजातीची पिल्ले बाहेर येणार

दहा-अकरा जानेवारीदरम्यान ग्रीन सी टर्टल कासवाने किनारपट्टीत घरटे बांधले असावे, असा अंदाज आहे. ग्रीन सी टर्टल असल्याबाबत सुरुवातीला कित्येकांना संभ्रम होता. मच्छिमारांकडून मिळालेल्या व्हिडिओनंतर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ नुपूर काळे यांनी कासवाची प्रजाती ग्रीन सी टर्टल असल्याचे सांगताच कांदळवन वनविभागाच्या वनाधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. या घरट्यात अंडीही टाकली असल्याने किमान ५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्याची किनारपट्टी ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवांच्या पिल्लांनी बहरणार असल्याने वन्यजीवप्रेमींना या दिवसाची उत्कंठा लागली आहे. सूर्यप्रकाशात अंड्यात उष्णता निर्माण झाल्यानंतर ५५ ते ६० दिवसांत ग्रीन सी टर्टल प्रजातीची पिल्ले बाहेर येतील, अशी माहिती कांदळवन वनविभागाचे संशोधन आणि क्षमता बांधणी विभागाचे उपसंचालक मानस मांजरेकर यांनी दिली. अंडी फुटल्यानंतर दोन दिवसानंतर कासवाची पिल्ले घरट्याबाहेर येतील. सध्या स्थानिक मच्छिमार कासवाच्या घरट्याचे संरक्षण करत आहेत.

महाराष्ट्र किनारपट्टीवर ग्रीन सी टर्टल कासवाचे घरटे खूप वर्षांनी दिसले आहे. सागरी वन्यजीवनातील घडामोडींबाबत ही सुखावह बाब आहे.
– वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन वनविभाग

(हेही वाचा हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारांचीही थकबाकी)

ग्रीन सी टर्टलबद्दल

  • पश्चिम किनारपट्टीत गुजरात किनारपट्टीवर ग्रीन सी टर्टल अंडी घालतात. महाराष्ट्रात दक्षिण कोकणातील समुद्रात ग्रीन सी टर्टल पाहायला मिळतात. पालघरच्या समुद्रातही ग्रीन सी टर्टल आढळले आहेत. मात्र राज्यात ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या कासवांच्या घरट्यांची तसेच पिल्लांची नोंद नव्हती.
  • ग्रीन सी टर्टल ही कासवाची प्रजाती इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन फॉर नॅचर या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेकडून संकटग्रस्त म्हणून घोषित झाली आहे. ही प्रजाती प्रामुख्याने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात आढळते. हिंदी महासागरातही या कासवाचे दर्शन होते.
  • या कासवाचे वयोमान ९० वर्षांचे आहे
  • जगभरात किनारपट्टी भागांतील वाढत्या बांधकामामुळे ग्रीन सी टर्टलचे घरटे किनारपट्टीपासून दूरापास्त झाल्याचे बोलले जाते. तसेच पाण्यातील प्रदूषणाचा फटकाही या कासवाला बसतोय. कित्येकदा ग्रीन सी टर्टल मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पंखे तूटून, गंभीर जखमांमुळे मृत्यू पावतात. काही देशांतील स्थानिक लोकांमध्ये ग्रीन सी कासवाच्या अंडी जेवणात वापरली जातात. त्यामुळे या कासवाला इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन फॉर नेचरकडून संकटग्रस्त घोषित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.