Gudi Padwa 2023 : यावर्षीच्या गुढीपाडव्याची वैशिष्ट्ये !

200

बुधवार दि. २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके १९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. यावर्षीच्या गुढीपाडव्याची काही वैशिष्ट्ये आहेत. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. तसेच गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत आहे. यापूर्वी २००४ मध्ये असा योग आला होता आणि या वर्षानंतर २०४२ मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार आहे.

( हेही वाचा : गुढीपाडव्याला सुट्टीच्या दिवशीही राणीची बाग राहणार खुली )

नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ ॲागस्ट २०२३ श्रावण अधिकमास आलेला आहे. त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी, नवरात्र, विजया दशमी, दीपावली इत्यादी सण १९ दिवस उशीरा येणार आहेत. ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ॲागस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत.

या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत आहे. २ जून २०२३ रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त देण्यात आले आहेत.

दा. कृ. सोमण

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.