Gudi Padwa 2023 : गुढीचे जगभरात महत्व

177

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा केली जाते. ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पुजा म्हणून इतिहासात आढळतो.

आपल्या सारखाच इतर देशात काठीपूजा /ब्रम्ह ध्वजपूजन / गुढी पूजन करण्याची परंपरा होती. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमातीमध्ये, सायबेरियातील सामोयीड्मध्ये, इस्रायल, युरोपमध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठी पुजा उत्सव, तसेच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये काठी उत्सव, आसाममध्ये बास पुजा, मणीपुर त्रिपुरामध्ये काठी पूजा, बलुचिस्तानात, राजस्थान, मध्यप्रदेश सुद्धा काठी पुजा आहे. तसेच, ओरिसामध्ये तर आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठी पूजा असते.

चैत्र शुद्ध प्रतिपदा! याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रम्हध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेऽस्मिन्‌ वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।

गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान आहे आणि पर्यावरण संदर्भ सुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महीने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी. किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे इत्यादी. इथे धार्मिक दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे.

इथे हा पर्यावरणवादी दृष्टीकोन दिसतो. हे चार महिने उन्हाळा असतो. जसे मनुष्य प्राण्याला उन्हाचा त्रास होतो, तसे प्राणी आणि पक्ष्यांना पण होतो. झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी आले, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन येणारा, कुरीयर वाला, किंवा कुणीही घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहिती आहेच. म्हणून पाण्याचे महत्व आहे.

शेतीसाठी महत्त्वाचा सण

पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे.
बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.

निसर्ग बदलाची चाहूल देणारा सण

वसंत ऋतु सर्वश्रेष्ठ ऋतु म्हणजेच ऋतूंचा राजा समजला जातो. जल, वायु, धरती, आकाश आणि अग्नी या पाच तत्वांचे मोहक रूप या काळात अनुभवता येते. शरदानंतरच्या हेमंत आणि शिशिर ऋतुत लोप पावलेले निसर्गाचे सौंदर्य, वसंतात पुन्हा प्राप्त होते.

वसंताचे आगमन होणाऱ्या काळात शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असते. आरोग्यास हितवर्धक, पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बरा करणारा, शिवाय धान्यातील किडिचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेद दृष्ट्या महत्त्वाचा आहे. म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे. वसंताचा उत्सव आशावादाचे प्रतिक आहे.

विजयाचे प्रतिक असलेला सण

या दिवसाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. असाच विजयदिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो विजय आणि आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रम्ह ध्वज /गुढ्या तोरणे उभी केली. ही गुढी /ब्रह्म ध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे.

कवी योगेश्वर अभ्यंकर यांचे भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद झाला होता याचे हे वर्णन खूप बोलके आहे.

विजयपताका श्रीरामाची,
झळकते अंबरी,
प्रभू आले मंदिरी.
गुलाल उधळून नगर रंगले,
भक्त गणांचे थवे नाचले,
राम भक्तीचा गंध दरवळे,
गुढ्या तोरणे घरोघरी…

अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.