Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा शोभायात्रा : समाजशक्तीतून समाजजागृतीचा जागर

152
Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा शोभायात्रा : समाजशक्तीतून समाजजागृतीचा जागर
  • सुप्रिम मस्कर

चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात भव्यदिव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाते. त्यातील प्रामुख्याने महाराष्ट्रात नावजलेल्या शोभायात्रा म्हणजे गिरगावतील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानद्वारे आयोजित शोभायात्रा, ठाण्याच्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेद्वारे काढली जाणारी शोभायात्रा आणि डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थानद्वारे आयोजित केली जाणारी शोभायात्रा! या शोभायात्रेतून ‘समाज शक्तीतून समाजजागृतीचा जागर’ करण्याचे काम संस्थांद्वारे केले जात आहे. त्यामुळेच शोभायात्रांच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊयात. (Gudi Padwa 2025)

(हेही वाचा – सोशल मीडियावर Ghibli चे वेड; ‘एआय’ चित्रांचा महापूर)

डोंबिवलीत ‘समृद्ध व संस्कृतीसंपन्न जीवनाची पंचसूत्री’ संकल्पना

पहिली शोभायात्रा म्हणजे, डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थानद्वारे आयोजित केली जाणारी शोभायात्रा. ३१ डिसेंबर १९९८ साली डोंबिवलीतील मदन ठाकरे चौकात काही तरुणांनी भर चौकात पाश्चात्य गाण्यावर नृत्य केले. त्यामुळे पुढे निर्माण होणारे पाश्चात्य संस्कृतीचे संकट थोपवण्यासाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन श्री गणेश मंदिर संस्थानकडे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला. त्या वेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीपाद वामन ऊर्फ आबासाहेब पटवारी होते. त्यानंतर आबासाहेब पटवारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शोभायात्रेची ही संकल्पना १९९९ च्या गुढीपाडव्याला पहिल्यांदा राबवली गेली. त्यानंतर आजतागायत श्री गणेश मंदिर संस्थान गुढीपाडव्याला शोभायात्रेचे आयोजन करते. दरवर्षी गुढीपाडव्याच्या ३ ते ४ महिने आधी गावातील सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींची मिळून एकूण १५ सदस्यीय संयोजन समिती स्थापन केली जाते. त्यानंतर संयोजन समितीचे १५ जण आणि ११ विश्वस्त मिळून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतात. (Gudi Padwa 2025)

दरवर्षी वर्षभरातील ज्वलंत विषयांवर लोकांचे समाजप्रबोधन व्हावे, या अनुषंगाने कार्यक्रम ठरवले जातात. उदा. दुष्काळात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारखी मोहिम, लातूर भूकंपावेळी भूकंपग्रस्तांना मदतीचा हात, महाडच्या महापुरावेळी नुकसानग्रस्तांना मदत, जलसंवर्धनाची कामे याआधी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. तसेच आदिवासी भागात मंदिर पुनर्निर्मिती कामेही करण्यात आली आहेत. यंदा ‘समृद्ध व संस्कृती संपन्न जीवनाची पंचसूत्री’ या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वधर्म, स्वदेश, स्वावलंबन, स्वसंस्कार, स्वभाषा या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह प्रवीण दुधे यांनी दिली. दरवर्षी या शोभायात्रेला २५ ते ३० हजाराहून अधिक लोक सहभागी होत असतात. यंदा शोभायात्रेचे २७ वे वर्ष असून ४० ते ५० चित्ररथ आणि ६० संस्थांचा समावेश या शोभायात्रेत असेल. (Gudi Padwa 2025)

या शोभायात्रेचे व्यापारीकरण करण्यात आलेले नाही. ऐच्छिक मदतीद्वारे कार्यक्रमाचा खर्च भागवला जातो. मात्र त्यातही श्री गणेश मंदिर संस्थान सर्वाधिक आर्थिक भार सांभाळते. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यात शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी ‘देवदेश उपासना’ या शीर्षकाखाली १५०० विद्यार्थ्यांकडून गणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, रामरक्षा, हनुमान स्त्रोत्र पठण आणि देशभक्तीपर गाणी गायन करून घेतले. तसेच मुलांना ‘छावा’ हा चित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. या वर्षी श्री गणेश मंदिर संस्थानातून रामाची आणि गणेशाची महापूजा करून शोभायात्रेची सुरुवात होईल, असेही दुधे म्हणाले. (Gudi Padwa 2025)

(हेही वाचा – BMC : नितीन शुक्ला यांची दीड महिन्यात बदली; बी विभागात आता कशी करणार कारवाई?)

ठाण्यात गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत भरणार ‘संस्कृतीचा महाकुंभ’

गुढीपाडव्यानिमित्त निघणारी दुसरी शोभायात्रा म्हणजे ठाण्याच्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी शोभायात्रा. या शोभायात्रेबद्दल श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र कराडकर यांनी सांगितले की, ठाण्याच्या शोभायात्रेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली असून रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करत आहोत. आजघडीला ठाण्यात १३ उपयात्रा निघतात. यावर्षी ‘संस्कृतीचा महाकुंभ’ या संकल्पनेवर आधारित शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीची ओळख, परिचय आजच्या पिढीला करून देण्यासाठी या वर्षी ‘संस्कृतीचा महाकुंभ’ या संकल्पनेअंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्चपासून श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास संस्थेद्वारे कार्यक्रमाच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. त्यात महिला पौरोहित्य वर्गाचे रुद्रपठण, नृत्यधारा कार्यक्रम, संतसंमेलन, गंगा महाआरती, दीपोत्सव, सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकार यांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (Gudi Padwa 2025)

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती देणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम, देशप्रेमाची भावना निर्माण करण्याचे काम संस्था करत आहे. मागील वर्षी ६० हजार लोक या ठाण्यातील शोभायात्रेत सहभागी झाले असून यंदा हा आकडा लाखांच्या घरात असेल, असा अंदाजही कराडकर यांनी व्यक्त केला. तसेच या शोभायात्रेत ७५ संस्थांचे ७५ चित्ररथ सहभागी होणार आहे. या सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे, प्रदूषणाला हानीकारक असणारी आतिषबाजी, कर्णकर्कश्श वाद्यवादन संस्था करत नाही, असेही कराडकर म्हणाले. मग यासगळ्या गोष्टींना पर्याय म्हणून सनईचौघडा, लेझीम पथक, मल्लखांब यांचे प्रात्यक्षिक शोभायात्रेत दाखवले जाते. (Gudi Padwa 2025)

कराडकर यांनी सांगितल्याप्रमाणे, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा तरुण पिढीवर निर्माण होत असताना गुढीपाडव्याच्या निमित्त संस्थेद्वारे तरुणांना मनाचे श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन होत असते. त्यातही यंदा शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. त्यामुळे गुढीपाडव्यातील शोभायात्रेसह इतिहासांची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास वंदन करून श्री कौपिनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. (Gudi Padwa 2025)

(हेही वाचा – ATM Fee Hike : १ मे पासून बँकेचे आणि एटीएममधून पैसे काढण्याचे ‘हे’ नियम बदलणार)

गिरगावात ‘मातृभाषेला घालू साद; मायमराठी अभिजात’ या संकल्पनेवर स्वागतयात्रा

दरम्यान गेल्या २३ वर्षांपासून गिरगावातील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करते. गिरगावची शोभायात्रा ही ‘हिंदू नववर्ष स्वागतयात्रा’ म्हणून ओळखली जाते. या स्वागतयात्रेची संकल्पना स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष पराग वेदक यांची आहे. ही संकल्पना राबवण्यामागील कारण म्हणजे तरुण पिढीला हिंदू नववर्षाची माहिती नसते. अशा वेळी ३१ डिसेंबरबद्दल नकार घंटा वाजवण्यात काहीही अर्थ नसतो. त्यामुळेच हिंदू नववर्षाची रेष मोठी करून तरुणांपर्यंत पोहोवण्यासाठी या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिनाला पौराणिक, आध्यात्मिक, पर्यावरणीय अशा अनेक दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी गिरगावात होणारी शोभायात्रा मध्यवर्ती संकल्पना ठेवून राबवली जाते. त्यामुळे या शोभायात्रेत ‘स्त्री शक्तीचा जागर’, ‘पर्यावरण’, ‘महान पुरुषांचे महान राष्ट्र’, ‘भारताची संरक्षण सिद्धता’ अशा अनेक संकल्पनांवर आधारित शोभायात्रेचे आयोजन केले जाते. यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ‘मातृभाषेला घालू साद, मायमराठी अभिजात’ या संकल्पनेवर शोभायात्रा काढली जाईल. तसेच मराठीबरोबर ‘मातृभाषेला घालू साद’ असे म्हणायचे कारण म्हणजे सर्व भाषिक बांधव गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी होत असतात. (Gudi Padwa 2025)

त्यामुळे भारतीय मातृभाषांचा गौरव करण्यासाठी मराठीसह मातृभाषेचा गौरव करण्यात आला आहे. या वर्षीच्या शोभायात्रेत ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. गुढीपाडव्याला ‘चैत्रस्वागत’ नावाने विशेषांक काढला जातो. या अंकात कौशल इनामदार, प्रवीण दवणे यांसारख्या मातब्बर साहित्यिक मंडळींचे लेख समाविष्ट केले आहेत. त्या अंकाचे संपादन डॉ. अपर्णा बेडेकर यांनी केले असून अंकाचे मुखपृष्ठ सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालक यांनी साकरलेले आहे. या अंकात मायमराठीचा गौरव करणाऱ्या अनेक लेखांचा समावेश आहे. यंदा गिरगावच्या शोभायात्रेत कापरेश्वर मार्ग मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकारांनी मराठीला दिलेले शब्द, तसेच संतसाहित्य आणि वारकरी संप्रदाय यावरील देखावा उभारण्यात येणार आहे. जवळपास ५० संस्था गिरगावमधील शोभायात्रेत सहभागी होतील. गिरगावातील फडके गणपती मंदिर येथून या शोभायात्रेला सुरुवात होणार असून सिद्धीविनायक मंदिराजवळ स्वागतयात्रा समाप्त होईल, अशी माहिती स्वागत समिती सदस्य डॉ. अपर्णा बेडेकर यांनी दिली. (Gudi Padwa 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.