गुजरात पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि डीआरआयने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल 200 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ हस्तगत केले आहेत. दुबईहून स्क्रॅप बॉक्समध्ये हे ड्रग्ज आणण्यात आले होते. एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारवाईत हा माल जप्त करण्यात आलाय.
200 कोटींचे ड्रग्ज
यासंदर्भातील माहितीनुसार, दुबईवरून आणलेले हे ड्रग्ज गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. गुजरात एटीएसला या प्रकरणाची माहिती मिळाली. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 गिअर बॉक्समध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले. हे ड्रग्ज फेब्रुवारी महिन्यात कोलकात्यातील बंदरगाह येथे पोहचले. अतिशय चलाखीने हे माफिया भारतात ड्रग्ज आणत असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : फक्त ५० हजारात विदेशात फिरा! IRCTC च्या हवाई टूर पॅकेजबद्दल जाणून घ्या सर्व काही…)
या 36 गिअर बॉक्सपैकी ड्रग्ज बॉक्सची ओळख पटण्यासाठी 12 गिअर बॉक्सला पांढऱ्या रंगाची खूण करण्यात आली होती. पांढऱ्या रंगाचे हे 12 बॉक्स उघडल्यानंतर यातील हेरॉईन जप्त करण्यात आले. याबाबत माहिती देताना पोलीस महानिरीक्षक भाटिया यांनी सांगितले की, अद्याप ही कारवाई पूर्ण झालेली नाही. इतर गिअर बॉक्स सध्या चेक करण्यात येत आहे.गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलिस आणि अन्य एजन्सीने राबवलेल्या संयुक्त मोहीमेत हे यश मिळाले आहे. गुजरात पोलिसांनी याआधीही ड्रग्ज माफियांविरोधात मोठ्या कारवाया केल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community