स्मृतीस्थळावरील बाळासाहेबांनी रोपण केले गुलमोहराचे झाड पडले उन्मळून, पण महापालिकेने केले त्यांचे पुनर्रोपण

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या जागेवर गुलमोहराचे झाड रविवारी रात्री उन्मळून पडले. या उन्मळून पडलेल्या झाडाचे पुनर्रोपण करण्याचे काम महापालिका जी उत्तर विभागातील उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. विशेष म्हणजे हे झाड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात आले होते.

आठवण कायम राखण्याचा प्रयत्न…

सध्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी २ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला होता, त्यातील हे पहिले झाड शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांच्या हस्ते लावून या मोहिमचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु हे झाड उन्मळून पडल्यानंतरही महापालिकेच्या जी उत्तर विभागाने या झाडाचे पुन्हा त्याच ठिकाणी पुनर्रोपण करत एकप्रकारे स्मृतीस्थळावरील राज ठाकरे यांची आठवण कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजीपार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे या नजिकच्या मोकळ्या जागेत जिथे माँसाहेबांनी बकुळीचे झाड लावले आणि बाळासाहेबांनी लावलेल्या गुलमोहराचे झाड आहे तिथेच त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेत स्मृतीस्थळ बनवण्यात आले असून या दोन झाडांव्यतिरिक्त शिवसेना भवनच्या जागेवरील जे पिंपळाचे झाड काढले होते, त्याचे पुनर्रोपणही याच जागेत करण्यात आले होते. त्यामुळेच स्मृतीस्थळासाठी या जागेची निवड करण्यात आली होती.

या स्मृतीस्थळाच्या जागेवरील गुलमोहराचे झाड रविवारी रात्री उन्मळून पडले. हे झाडे बाळासाहेबांच्या हस्ते लावण्यात आले असल्याचा इतिहास असल्याने जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि उद्यान विभागाच्या अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिवसभर विशेष मेहनत घेत या झाडांचे पुनर्रोपण केले. त्यामुळे गुलमोहराचे झाड पुन्हा एकदा नव्या जोमाने बहरण्यासाठी उभे राहिले आहे.

( हेही वाचा : राजकीय पदार्पणापूर्वीच शिवसेनेवर चढले ‘तेजस’ तेज)

विशेष म्हणजे राज ठाकरे हे शिवसेनेत असताना त्यांनी २ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यातील पहिले गुलमोहराचे झाड शिवाजीपार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याशेजारी बाळासाहेबांच्या हस्ते लावण्यात होते. या वृक्षारोपणानंतर राज्यभर या मोहिमेला सुरुवात झाली होती. यावेळी बाळासाहेबांनी गुलमोहरासारखं तुझ काम बहरु दे अशाप्रकारचा आशिर्वाद दिला होता. त्यामुळे हे झाड म्हणजे केवळ बाळासाहेबांची आठवण नाही तर राज ठाकरे यांच्या वृक्षारोपण मोहिमेचीही आठवण देणारे आहे.

आज राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यामुळे त्यांना आता शिवसेनेत स्थान नसले तरी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील हे गुलमोहराचे झाडे हे बाळासाहेबांवरील प्रेमाचे प्रतिक होते. हे झाड पडल्याने बाळासाहेबांपासन त्यांचे नातेच तुटल्यासारखे होते. परंतु महापालिकेने त्यांच्या संकल्पनेतील स्मृतीस्थळावरील झाडाचे पुनर्रोपण करत त्यांचे बाळासाहेबांवरील असलेले प्रेम आणि त्यांचे अस्तित्व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here