Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि इतिहास

259
Guru Purnima 2024 : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो. (Guru Purnima 2024)

हिंदु शास्त्रामध्ये वरील श्‍लोक सांगितला आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्त्र (हजार) पटींनी कार्यरत असते. यावर्षी आषाढ पौर्णिमा अर्थात व्यासपूजन म्हणजेच गुरुपौर्णिमा २१ जुलै या दिवशी आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत तसेच गुरु-शिष्य परंपरा याविषयी पहाणार आहोत. (Guru Purnima 2024)

तिथी –

गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो.

उद्देश –

गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

महत्त्व – 

गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे. (Guru Purnima 2024)

(हेही वाचा – Guru Purnima 2024 : सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’)

गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत –

प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे; म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. (Guru Purnima 2024)

गुरुपूजनाचा विधी –

स्नानादी नित्यकर्मे आटोपून ‘गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये ।’ असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षि व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरु आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. (Guru Purnima 2024)

गुरु-शिष्य परंपरा – 

एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्‍न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल ?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा !’’ ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय ! गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. आज गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे. (Guru Purnima 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.