उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून विदर्भवासीयांच्या अंगाची लाहीलाही करुन सोडणाऱ्या उष्णतेच्या लाटांनी आता ब्रेक घेतला आहे. राज्यात सध्या वा-यांच्या वेगाचा प्रभाव वाढत शुक्रवारपर्यंत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता मान्सूनपूर्व हलक्या पावसाचा मुक्काम राहील. मात्र पावसाच्या गैरहजेरीत उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान आता वाढू लागले आहे.
( हेही वाचा : सावधान! बेस्ट वीजग्राहकांनो तुमची होऊ शकते फसवणूक)
मुंबईसह, पालघर आणि ठाण्यात पावसाची शक्यता नाही. परिणामी, मुंबईतील कमाल तापमानाने आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. पुणे, अहमदगर या भागांत १६ मे रोजी कमाल तापमानाने अनुक्रमे ४०.८ आणि ४३.६ अंश सेल्सिअस झाले आहे. तर विदर्भात ४६ अंशापर्यंत पोहोचलेले कमाल तापमान आता आटोक्यात येत आहे. विदर्भातील कमाल तापमानात घसरण झाल्याची नोंद झाली. विदर्भात मे महिन्यात ४३ ते ४५ अंशापर्यंत कमाल तापमान नोंदवले जाते. परंतु चंद्रपूर, नागपूरात कमाल तापमान ४० अंशाखाली नोंदवले गेले. राज्यातील कमाल तापमान यवतमाळ येथील ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. आता वाढत्या वा-यांच्या प्रभावात आणि हलक्या पूर्वमोसमी पावसामुळे विदर्भातही आता शुक्रवारपर्यंत तापमान नियंत्रणात राहिल.
मान्सूनच्या आगमनापूर्वीचे वातावरण
देशाच्या वायव्य भागांत तापमानाचा भडका सुरु असताना दक्षिणेकडील भागांत आता मान्सूपूर्व मूलभूत वातावरणातील बदल सुरु झाले आहेत. केरळात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. तर मान्सून येत्या तीन दिवसांत श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाच्या उर्वरित बहुतांश भागांत सध्या जोमाने वारे वाहताना दिसून येत आहे. हे वातावरण पावसाअगोदरची वातावरणातील पूर्वतयारी म्हणून टिपले जातात. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ते मणिपूर, मिझोरम आदी ईशान्येकडील राज्यात वा-यांचा वेग ताशी ४० किलोमीटर आहे.
राज्यासाठी पावसाचा अंदाज
राज्यात दक्षिण कोकणात बुधवार ते शुक्रवार मेघगर्जनेसह हलक्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली. उद्या मंगळवारीही रत्नागिरी, सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह हलका पूर्वमोसमी पाऊस दिसेल, मात्र त्याचा जोर फारसा नसेल. पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना गुरुवारपर्यंत हलक्या पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे. परभणी, हिंगोलीतही मंगळवारी आणि गुरुवारी यलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला.
Join Our WhatsApp Community