जिल्ह्यातील चाळीसगाव मालेगाव रोडवर मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत, तब्बल एक कोटींचा गुटखा जप्त केला आहे. यात ९२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा गुटखा व कंटेनर असा एकूण १ कोटी १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा गुटखा राजस्थानहून मुंबईला पाठवण्यात येत होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या ३६ चालकांवर गुन्हे दाखल )
पोलिसांची कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राजस्थान मधील उदयपूर येथून मुंबईकडे कंटेनर (क्रमांक एच. आर. ३८ ए. बी. २१९०) मधून गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने रात्री १२.३० वाजेपासूनच बेलगंगा कारखान्या जवळील रस्त्यावर सापळा रचला असता रात्री १ वाजेच्या सुमारास सदरचा कंटेनर येथून जात असताना पोलीसांनी अडवला, प्रथम कंटेनर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. या कंटेनरला पानमसाला नावाचे सील आणि तीन कुलूपे लावली असल्याने, पोलीस निरीक्षक ठेंग यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन माहिती पक्की असल्याने सरकारी पंचांसमक्ष हे कुलूप तोडण्यात आले.
अधिक तपास सुरू
या कंटेनरमध्ये फायू एच. के. नावाचा गुटखा पूर्णपणे भरलेला असल्याचे आढळून आले. याबाबत अन्न व औषध विभागाकडून खात्री करता हा गुटखाच असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज दुपारी या प्रकरणी कंटेनर चालक अस्ताक उमर मोहंमद (हरीयाणा) याला ताब्यात घेत ९२ लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा त्यासोबत २० लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण १ कोटी १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक शांताराम पवार याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community