10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा पुंजका! काय आहे प्रकार?

126

लहान मुलं पाटीवरची पेन्सिल, खडू, खायची माती खाताना दिसतात. पण एका मुलीने चक्क केस खाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलीने एक नाही दोन नाही तर तब्बल अर्धा किलो वजनाचे केस खाल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार गोंदियातील असून १० वर्षीय मुलीच्या पोटात तब्बल अर्धा किलो केसांचा पुंजका आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोदिंयातील बालरोग तज्ज्ञांनी या मुलीवर शस्त्रक्रिया केली आणि १० वर्षीय मुलीला जीवदान दिले आहे.

काय घडला प्रकार

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील 10 वर्षीय मुलीला तीन दिवसांपासून भूक न लागणे, सतत पोटात दुखणे, उलटी होणे असा त्रास जाणवत होता. याकरता तिच्या वडिलांनी तिला तिरोडा येथील बालरोग तज्ज्ञांना दाखविले. डॉक्टरांनी मुलीची सोनाग्राफी केली. तेव्हा मुलीच्या पोटात वेगळी वस्तू असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी या मुलीला पुढील उपचाराकरीता गोंदिया येथील खासगी व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. विभु शर्मा यांच्याकडे पाठविले.

व्दारका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही मुलगी पुढील उपचार दाखल झाल्यानंतर डॉ. शर्मा यांनी मुलीची तपासणी केली. मुलीच्या पोटाचे सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या सिटीस्कॅनदरम्यान, पोटात केसांचा पुजंका असून तो आतड्यात गुंतलेला असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी या मुलीच्या वडिलांकडे विचारणा केली. तेव्हा मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ती लहानपणी केस खायची. परंतु, आता तिने केस खाणे बंद केले आहे.

यावर डॉक्टर शर्मा यांनी त्या मुलीची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे असल्याचे मुलीच्या पालकांना सांगितले. शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले. डॉ. शर्मा यांच्या मदतीने तब्बल तीन तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अर्धा किलो केसांचा पुजंका त्या मुलीच्या पोटातून काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर मुलीची प्रकृती बरी असून तिला लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.