रखडलेले हँकॉक पूल होणार वाहतुकीसाठी खुले

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या हँकॉक पुलाच्या रेल्वेमार्गावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या हद्दीतील पुलाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांमध्येच हे पूल वाहतुकीसाठी खुले होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे हे पूल खुले झाल्यास पूर्व आणि पश्चिम दिशेचा मार्ग आता स्थानिकांसह वाहनचालकांसाठी सुलभ होणार आहे. या पुलाचे काम मार्च २०२१पर्यंत पूर्ण होणेअधिकाऱ्यांना अपेक्षित होते, परंतु तब्बल १४ महिने उशिराने हे पूल खुले होणार आहे.

हँकॉक पूल होणार वाहतुकीसाठी खुले

माझगाव-सँडहस्टर्ड शिवदास चापसी येथील हँकॉक पूल हा जुना झाला असून मध्य रेल्वेने तो वापरण्यासाठी असुरक्षित असल्याने हे पूल तोडून नवीन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली होती. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. . परंतु रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस.कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. ज्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढत एकूण कंत्राट किंमत ७७ कोटी एवढी झाली.

( हेही वाचा : सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती, नियमात होणार हे बदल )

परंतु आता या पुलाच्या दोन्ही बाजूला केवळ पुलाचे सिमेंटीकरण केले जात असून हे काम पुढील १० ते १५ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर या पुलाचे लोकार्पण करून ते खुले केले जाईल जाईल अशी माहिती मिळत.दरम्यान, पुलाच्या बाजूने वाहने येण्यास रस्त्याची जागा कमी राखल्याने स्थानिक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाचा निकालही महत्वाचा ठरणार आहे. याबाबत पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पुलाचे काम अंतिम टप्यात असून उर्वरित कामे पूर्ण झाल्यावर लवकरच ते वाहतुकीकरता खुले केले जाईल, असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here