कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक’ मोहीम!

122

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम दिनांक १ जून २०२२ पासून सुरु करण्यात आली आहे. दिनांक ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी कोविड लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

( हेही वाचा : येत्या मंगळवार, बुधवारी शहरात १०० टक्के पाणीकपात)

३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक’ मोहीम

दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे तसेच दिनांक १६ मार्च २०२२ रोजी पासून १२ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसर्‍या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षावरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.

कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक १ जून, २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत “हर घर दस्तक मोहीम २” राबविण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ वर्ष व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.

महापालिकेचे आवाहन

या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. जेणेकरुन, पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून व त्याद्वारे लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाज माध्यमांचा देखील उपयोग करण्यात येत आहे.

मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.