पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्याचे आवाहन करत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान, हर घर तिरंगा अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, भारताच्या तिरंग्यातील सगळ्यात वरचा रंग केशरी हा शौर्य, मधला पांढरा रंग हा शांती, सत्याचा तर शेवटचा तिसरा हिरवा रंग हा सुजलाम सुफलाम ऐश्वर्याचे प्रतिक मानले जाते. परंतु आज या दिसणाऱ्या तिरंगा ध्वजापूर्वी भारताने पाच ध्वज पाहिले आहे. पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले आणि सध्याचा तिरंगा कसा फायनल झाला ते वाचा…
(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)
1) 1906, कलकत्ता
(unofficial flag of india in 1906)
भारताचा पहिला झेंडा 1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा झेंडा फडकवला गेला असल्याचे सांगितले जाते. लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम् हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळं असा हा झेंडा होता.
2) 1907, जर्मनी
(Berlin committee flag 1907)
भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये 1907 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या.
1936 साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता. केशरी पट्ट्यावर चंद्र , सुर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या 8 प्रातांचे प्रतिक मानले जात आहे.
3) 1917, होमरूल चळवळीनंतरचा झेंडा
(Home Rule movement 1917)
लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरुल चळवळ 1917 साली वेग घेत होती. या चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले होते. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. यापूर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळं नव्हती, उलट यावर 7 तारे होते, हे 7 तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते.
1918 साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतल्याचे पाहायला मिळते.
4) 1921, आंध्र प्रदेश
(flag unofficially adopted in 1921)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली होती आणि 1920 पर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी होत धरत होती. 1921 साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटीश लष्करात होते तेव्हा त्यांची आणि गांधींची भेट झाली होती.
पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक होतं. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 1923 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले, यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती.
5) 1931, तिरंगी झेंडा आणि चरखा
(This flag waw also the battle ensign of the indian national army)
1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव संमत झाला होता. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. 1931 साली असलेल्या झेंड्यात सध्या असलेली रंगांची रचना अस्तित्वात आल्याचे पाहायला मिळते. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिले जात होते. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकल्याचे म्हटले जात आहे.
6) 1947, सध्याचा फायनल तिरंगा
1947 साली घटना समितीमध्ये स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आरखडा तयार होत होता. यावेळी स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असला पाहिजे यावर देखील चर्चा झाली. 1931 मध्ये स्वीकृत झेंडा या समितीने एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी फक्त सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेले अशोकचक्र आले. परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना भारतात ब्रिटीशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा ताठ मानेने फडकवला.
Join Our WhatsApp Community