देशात दररोज कित्येक मोर्चे, उपोषण, संप, निषेध, प्रदर्शने होताना आपण बघत असतो. यातही विविध रेकॉर्ड मोडले जातात. नुकतेच मुंबईतील आझाद मैदानावर एसटी महामंडळाच्या राज्यभरातून आलेल्या लाखो कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी रात्रं-दिवस ठाण मांडून होते. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी तब्बल ५ महिने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७३ वर्षांच्या कारकीर्दीतील २०२२ या वर्षातील हा संप ऐतिहासिक ठरला. या लालपरीच्या ऐतिहासिक संपाप्रमाणे रेल्वेचा देखील एक ऐतिहासिक मोठा संप १९७४ साली झाला होता. यावेळी रेल्वे तब्बल २० दिवस ठप्प होती. रेल्वेच्या या संपाबद्दल तुम्हाला माहिती आहे का…? नसेल तर जाणून घ्या…
(हेही वाचा – 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)
१९७४ साली झालेला हा संप इतक्या मोठ्या स्तरावर झाला की त्याचा रेकॉर्ड मोडला गेलेला नाही. १९७४ साली मे महिन्यात भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला जो तब्बल २० दिवस म्हणजे ८ मे ते २७ मे पर्यंत चालला. यामध्ये एकूण १७ लाख कर्मचारी सहभागी झाले होते. १८५३ सालापासून देशात रेल्वे सेवा अखंडीत सुरू आहे. मात्र कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने झाल्याने सरकारने रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडणारे होते आणि कोरोना व्हायरसमुळे ही सेवा पहिल्यांदाच बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.
१९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वेमेंस फेडरेशनच्या चेअरमनपदी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय रेल्वेत १४ लाख कर्मचारी होते. जॉर्ज यांनी ८ मे १९७४ ला देशव्यापी संप पुकारला आणि रेल्वेचा चक्का जाम झाला. कित्येक दिवस रेल्वेचे कामकाज ठप्प होते. प्रवाशांची गैरसोय झाल्याने सरकारने तीन आठवड्यानंतर मिलटरी बोलावून संप चिरडला. यानंतर संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे क्वॉर्टरमधून बेदखल केले, नोकरीवरुन काढून टाकले. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यानंतर कामगार, कष्टकऱ्यांनी इंदिरा गांधींना कधीही स्वीकारले नाही.
हा संप इतका व्यापक होता की, कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधी सरकार हादरून सोडले, या संपात फूट पाडण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न झाले, हजारो लोकांना पकडून जेलमध्ये डांबले गेले. दरम्यान, हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले यानंतरही त्यांची संपाबाबतची एकजूट मोडली नाही. इंदिरा गांधी सरकार कोंडीत पकडले गेले होते. त्यांना या संपानंतर भारतात अशा अनेक कारणांमुळे आणीबाणी लागू करावी लागली होती. या संपाचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस करत होते. ते रेल्वे युनियनचे लीडर होते, त्यांनी या संपासाठी घोषवाक्य तयार केले होते, “बेटर इन जेल, देन इन रेल”. हा संप फसला असे सरकारकडून सांगण्यात आले होते, पण त्याचे चांगले परिणाम नंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना पहायला मिळाले. स्वतंत्र भारतातील हा पहिलाच इतक्या मोठया प्रमाणात झालेला रेल्वेच्या इतिहासातील संप होता.
इतक्या मोठ्या संपामागे काय होते नेमके कारण ?
तेव्हा रेल्वेमध्ये ब्रिटिश काळापासून फेरीच्या वेळेप्रमाणे कामाचे तास ठरत होते. म्हणजे एखादी रेल्वे ३६ तास रुळावर धावत असेल तर त्या संबंधी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सलग ३६ तास असायचे. त्यामुळे त्यांना सलग तासंतास काम करावे लागे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा प्रकार असाच सुरू होता. कामाचे तास इतर नोकरदारांसाठी जसे दिवसाचे ८ तास ठरले होते त्याप्रमाणे रेल्वेमध्ये ही कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट या ८ तासांच्या असाव्या, ही पहिली प्रमुख मागणी होती. यानंतर दुसरे म्हणजे, पगारवाढ रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक वर्षे मिळालीच नव्हती त्यामुळे कर्मचारी या संपात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तिसरा वेतन आयोग लागू झालेला असून सुद्धा रेल्वेमध्ये पगार कित्येक वर्षं स्थिर होते आणि कर्मचाऱ्यांना बोनसही देण्यात येत नव्हता.
Join Our WhatsApp Community