‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास!

253

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जायचं असेल तर प्रवाशांना आपली एसटी हक्काची वाटते. आता एसटीला लालपरी किंवा लाल डब्बा या नावानेच ओळखलं जातं. म्हणजेच काय तर रंग ही एसटीच्या गाडीची खरी ओळख आहे. पण एसटीने आपल्या गाड्यांसोबतच त्यांचे रंगही अनेकदा बदलल्याचे पाहायला मिळाले. आता रंग बद्दलण्याला मराठीत थोडा निराळा अर्थ आहे. पण एसटीने बदलले रंग हे अनेक प्रवाशांच्या आठवणींत आनंदाची उधळण करणारे आहेत. तर अनुभवूया एसटीचा हा कलरफूल प्रवास…

( हेही वाचा – ‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक बस)

बदलत्या काळानुसार आपणही बदलायला हवं हे धोरण लालपरीने स्वीकारलं आणि प्रवाशांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी कसा होईल, याकडे आवर्जून लक्ष दिलं. एसटी महामंडळातील अगदी लालपरीपासून हिरकणी, विठाई, अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही यासारख्या बसेसच्या परिवारात आता आगळी-वेगळी नवख्या रूपातील लालपरी इलेक्ट्रिक बस म्हणून शिवाईपर्यंत येऊन पोहोचली आहे.

लाकडाची बांधणी असलेली निळ्या-चंदेरी रंगाची बस

एसटी बसचा पहिला प्रवास सुरू झाला १ जून १९४८ साली. निळ्या – चंदेरी रंगाच्या अवघ्या ३६ लाकडी बेडफोर्ड बसेसह एसटी महामंडळाचा शुभारंभ झाला. नगर – पुणे – नगर या मार्गावर पहिली बस धावली. ३० आसनांची क्षमता असलेल्या या बसेस पेट्रोलवर धावत होत्या.

1

पहिली लाल पिवळी बस

१९६० साली निळ्या आणि चंदेरी रंगाच्या ऐवजी लाल आणि पिवळ्या रंगाचा प्रयोग करण्यात आला. या एसटीपासून पहिल्यांदाच एसटी लाल रंगाने रंगली.

3

हिरव्या-पांढऱ्या रंगाची एशियाड

१९८२ साली एशियन गेम्स स्पर्धेसाठी सुरू करण्यात आलेली एशियाड बस एसटीने दादर – पुणे या मार्गावर चालवली. याचा रंग हिरवा आणि पांढरा होता. एशियन गेम्स या नावावरुन एशियाड हे नाव पडलं.

7

2×2 पांढरी डिलक्स एसटी बस

प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी १९९३ साली अत्याधुनिक डिलक्स बसेस ताफ्यात समाविष्ट करण्यात झाल्या. २ बाय २ आरामदायक आसनव्यवस्था असलेल्या या बसचा रंग पांढरा होता.

8

वातानुकूलित निळ्या रंगाची डिलक्स बस

प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी १९९६ साली डिलक्स वातानुकूलित बस सुरू करण्यात आली. या बसचा रंग निळा होता.

9

अॅक्व्हा ग्रीन एअर बस

आकर्षक दिसणाऱ्या या अॅक्व्हा ग्रीन रंगाच्या बसने प्रवाशांची मने जिंकली. आकर्षक काचा, खिडक्यांमुळे या बसला नवा लूक मिळाला होता.

10

साधी लाल-पिवळी बस

पुढच्या दाराची आजतागायत सुरू असेलेली ही लाल पिवळी बस सुरू आहे. या बसमुळे एसटीला लालपरी अशी ओळख मिळाली.

11

पोपटी रंगाची मिनी बस

दुर्गम आणि डोंगराळ भागात मोठ्या बसेसला होणारा त्रास दूर करण्यासाठी ही पोपटी रंगाची मिनी बस सुरू करण्यात आली.

12

शिवनेरी व्होल्वो बस

२००२ पासून दादर- पुणे मार्गावर व्होल्वो शिवनेरी वातानुकूलित बसेस सुरु झाल्या आणि अल्पावधीत प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. स्वीडिश बनावटीच्या असलेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्वो बसेस म्हणजे खऱ्या अर्थाने नव्या युगाची दखल घेणारी आधुनिक सेवा आहे. मुंबई – पुणे – मुंबई प्रवासासाठी – आजही प्रवाशांची पहिली पसंती शिवनेरी बसेसना असते. या बसचा रंग पांढरा आणि आकाशी असा आहे.

13

पांढरी-हिरवी वारी बस

२००८ साली एसटीने ही बस सुरू केली. या मोठया बसेस वारी बस या नावाने महाराष्ट्राच्या विविध भागात लोकप्रिय झाल्या. आकर्षक हिरवी सफेद रंगसंगती या वैशिष्ट्यांमुळे या बसेस अल्पावधीतच प्रवासी वर्गात लोकप्रिय झाल्या.

15

सिंहस्थ स्पेशल कुंभमेळा बस

सन २०१५ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ५०० विशेष कुंभमेळा बसेसची निर्मिती करण्यात आली होती. हरित कुंभमेळा या संकल्पनेवरून या बसेसना आकर्षक हिरवी रंगसंगती देण्यात आली होती.

17

पुशबॅक हिरकणी – २०१५

८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एयर सस्पेन्शनयुक्त, निमआराम / एशियाड बसचे हिरकणी असे नामकरण करण्यात आले. सर्व शहरे जोडणारा आरामदायक प्रवास अशी हिरकणी बसेसची ख्याती असून, सध्या एस.टी.च्या ताफ्यात हिरव्यापांढऱ्या रंगाच्या हिरकणी बसेस उपलब्ध आहेत.

18

शिवशाही – २०१७

प्रवाशांना किफायतशीर दरात आरामदायक वातानुकूलित प्रवास करता यावा या हेतूने एसटीने जून २०१७ पासून शिवशाही या माफक दरातील वातानुकूलित सेवेचा प्रारंभ केला. हिरकणी बस प्रमाणेच शिवशाही बससेवा देखील सर्व शहरे आणि जिल्हे जोडणारी किफायशीर वातानुकूलित सेवा आहे. या बसचा रंग पांढरा असून यावर केशरी रंगसंगती सह वेगवान धावणारे अश्वदेखील दाखवण्यात आले आहेत.

18 1

शिवाई इलेक्ट्रिक बस

राज्यात ज्या मार्गावर पहिली एसटी महामंडळाची बस धावली होती त्याच मार्गावर म्हणजे पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे. या बसला ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले असून याचा रंग केशरी, जांभळा आणि पांढरा असा आहे.

Untitled

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.