धारावीत शुन्याची हॅट्रीक! सात दिवसांत ‘कोरोना’चे चारच रुग्ण

कोरोनाचा वाढता आकडा कमी करण्यात महापालिकेला यश

मुंबईत कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक स्तरावर धारावी पॅटर्नचा बोलबाला झाल्यानंतरही या विभागातील कोविडचा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्यात महापालिकेला यश आले आहे. दाटीवाटीने वसलेल्या या वस्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे मागील सात दिवसांमध्ये धारावीमध्ये केवळ चारच रुग्ण आढळून आले आहेत. या सहापैंकी तीन दिवसांमध्येही एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे धारावीत नियंत्रणात आलेला कोरोनाचा आजार आता संपूर्ण मुंबईला एकप्रकारे दिलासा देणारी बाब ठरत आहे.

वाढता आकडा कमी करण्यात महापालिकेला यश

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये ०४ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर येथील बाधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र, त्यानंतर महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्यासह सर्वांच्या मदतीने जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि विभागीय आरोग्य अधिकारी आणि त्यांची टिम तसेच इतर विभागांच्या मदतीने धारावीवर अधिक लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर रुग्णसंख्येचा वाढता आकडा कमी करण्यात महापालिकेला यश आले. याची दखल जागतिक स्तरावर घेत धारावी पॅटर्नची चर्चा जगभरात होवू लागली. त्यानंतर कमी झालेल्या रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू न देण्याकडे महापालिकेने अधिक लक्ष दिले. यात त्यांनी आजही सातत्य कायम राखले आहे.

धारावीत आतापर्यंत रुग्णसंख्या शुन्यावर

धारावीत आतापर्यंत रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. या विभागात ३० मे २०२१ रोजी शेवटची दोन अंकी रुग्णसंख्या आढळून आली आहे. आजपर्यंत या विभागात दोन अंकी रुग्ण संख्या वाढू दिली नसून दिवाळीतच सलग तीन दिवस एकही रुग्ण धारावीत आढळून आला नाही. मागील सात दिवसांचा विचार केला तर चार रुग्ण आढळून आले आहेत. तर सात पैकी चार दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही.

(हेही वाचा – फटाक्यांमुळे आगी लागण्याचे प्रमाण यंदा अधिक)

रविवारी धारावीत एकही रुग्ण आढळून आला नाही तर, दादरमध्ये ०९ आणि माहिममध्ये ०३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीमध्ये सध्या केवळ १४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर दादर आणि माहिममध्ये अनुक्रमे ८४ व ७१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे ज्या धारावीमध्ये कोविडचा कहर सुरु होता, तेथील रुग्णंसंख्या नियंत्रणात आणल्यानंतर येथील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१५१ एवढी झाली आहे. तर त्यातुलनेत माहिममध्ये सर्वाधिक एकूण बाधित रुग्णांची संख्या १० हजार ७०९ आणि दादरमध्ये १० हजार ४१९ एवढी झाली आहे. त्यामुळे धारावीच्या तुलनेत एकूण बाधित रुग्णांच्या संख्येने दादर आणि माहिमने दस हजारीचा पल्ला पार केलेला आहे.

मागील सात दिवसांधील धारावीमधील रुग्णसंख्या

  • ०१ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ०१
  • ०२ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ००
  • ०३ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ०२
  • ०४ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ०१
  • ०५ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ००
  • ०६ नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ००
  • ०७नोव्हेंबर २०२१ : रुग्ण संख्या- ००

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here