कोरोनाकाळात रुग्णसेवा देण्याचे आव्हानात्मक काम करणे सोपे नाही, या कामासाठी कोविड योद्ध्यांची खरोखरच प्रशंसा करायला हवी. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी झटणा-या कोरोना योद्ध्यांचे मनापासून आभार, या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी बीकेसी कोविड केंद्राच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्ताने गौरवोद्गार काढले. गुरूवारी सकाळी बीकेसी कोविड केंद्राचा दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
( हेही वाचा : राज्यात लवकरच ७ हजार पदांसाठी पोलीस भरती!)
मान्यवरांनी केले कौतुक
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यापासून मुंबईकरांना वाचवणात बीकेसी कोविड केंद्राने मोलाची भूमिका बजावली. देशातील पहिल्या मोठ्या स्तरावर उभारलेल्या बीकेसी कोविड केंद्राने दोन वर्षात असंख्य अडचणींचा सामना केला. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रवासात सहभागी झालेल्या कोविड योद्ध्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोनासारख्या समस्येतून सुखरुप बाहेर काढणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत, या शब्दांत कौतुक करत अभिनेत्री अल्का कुबल- आठल्ये यांनी डॉक्टरांचे आभार मानले. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करताना चित्रीकरण पूर्ण करताना आपण मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या आशाताईंना गमावले. युनिटमधील लोकांनाही कोरोनाची बाधा झाली. कोरोनासारख्या आजारातून रुग्णांना बरे करण्यासाठी केंद्राचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांनी मोलाची भूमिका पार पाडली असेही त्यांनी सांगितले. यावेळी बॉलिवूड नृत्यदिग्दर्शिका फराह खान तसेच मुंबईतील इतर कोविड केंद्रातील अधिष्ठाता, पालिका अधिकारीही उपस्थित होते.
दोन वर्षांच्या प्रवासात कोविड केंद्राने केवळ कोरोनाचाच नव्हे तर दोन चक्रीवादळांचाही सामना केला आहे. एका रात्रीत केवळ २४ तासांच्या मुदतीत कोविड केंद्रातील रुग्ण हलवले गेले. वादळ शमल्यानंतर कोविड केंद्राची पुन्हा नव्याने डागडुजी केली गेली, ही आठवण सांगताना डॉ डेरे यांच्या अंगावर शहारे आले. आतापर्यंत २९ हजार कोरोना रुग्णांना बीकेसी कोविड केंद्रात उपचार दिले गेले. त्यापैकी १२ टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरील होते. जवळपास ५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. यात दुसरा डोस तसेच बुस्टर डोसचाही समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.