मुंबई हे पर्यटन क्षेत्र आहे. इथे लाखो लोक देश विदेशांतून पर्यटनासाठी येतात. इथे अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी महत्वाचे स्थळ म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहायलय.
वस्तूसंग्रहालयाचा इतिहास?
चर्चगेट येथून गेट वे ऑफ इंडियाकडे जाताना अत्यंत सुंदर असे हे म्युझियम लागतं. या वास्तूचा आराखडा जॉर्ज विटेट यांनी तयार केला होता. या संग्रहालयात तत्कालीन इतिहास, स्थापत्यकला, संस्कृती, कलात्मकता याविषयी सुंदर माहिती मिळते.
१९१५ साली या वास्तूची निर्मिती झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी ही वास्तू प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला तेव्हा खुली करण्यात आली. या वास्तूचा देखावा हिंदू मंदिरे आणि राजपूत शैलीचा आहे. तीन मजल्यांची सुमारे दोन एकरच्या परिसरात उभारण्यात आलेली ही वास्तू म्हणजे आबालवृद्धांसाठी कलात्मक शैक्षणीक सहलच जणू.
या वस्तूसंग्रहालयात काय पाहू शकता?
अत्यंत मनोहर अशा या वास्तूमध्ये काळे-पांढरे पाषाणांचे प्राचीन शिल्प आहेत. गांधारकालीन मूर्ती व बुद्धमूर्ती येथे तुम्ही पाहू शकता. सिंधू संस्कृतीचे अवशेष, रामायणातील २०० लघुचित्रे या वास्तूची शोधा वाढवत आहेत. त्याचबरोबर हिंदू संस्कृतीतील अनेक प्राचीन कलात्मक चित्रे पाहून आपले मन रमते.
नौकावहन तंत्रज्ञानाची माहिती, समुद्र मार्गातील नकाशांची माहिती असा सामुद्रिक वारसा जतन करुन ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मौल्यवान दगड, खंजीर असा वारसाही पाहायला मिळतो. यूरोप, चीन, जापानमधील चित्रे पाहायला मिळतात. प्राचीन शस्त्रे आणि वस्त्रे या वस्तूंनी नटलेलं हे दालन पाहून आपण इतिहासात जातो. इथे १२ व्या शतकातील पाटण-गुजरात येथील पटोला साड्य़ा देखील पाहायला मिळतात. तसेच अनेक प्रकारची तैलचित्रे देखी तुम्ही पाहू शकता.
लहान मुलांसाठी गंमत जम्मत
ह्या वस्तूसंग्रहालयाला सुमारे दोन लाख विद्यार्थी दरवर्षी भेट देतात. ’स्वतःच शोधा, शिका आणि इतरांनाही माहिती द्या; अशी त्रिसुत्री येथे राबवून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीस मुलांना करायला मिळतात. लहान मुले या प्राचीन, सांस्कृतिक, ऐतिहासिक गोष्टींमध्ये रमून जातात.
या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहायलयात कधी भेट द्यावी?
सोमवार ते रविवार सकाळी १०.१५ ते संध्याकाळी ६ पर्यंत या वास्तूला तुम्ही भेट देऊ शकता. सकाळीच येथे या जेणेकरुन तुम्हाला संपूर्ण वास्तू पाहता येईल. कारण इथे तुमचे ३ ४ तास सहज निघून जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवरुन किंवा चर्चगेटवरुन तुम्ही टॅक्सीने येऊ शकता.
Join Our WhatsApp Community