दादरमधील फेरीवाल्यांविरोधातील कारवाईमध्ये आता पोलिसांनी विशेष रस घेतला असून महापालिकेच्याऐवजी पोलिसांनी आता या कारवाईत आपला धाक निर्माण करण्चयाचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, दादरमध्ये शिवाजी पार्क पोलिसांच्यावतीने कर्तव्यदक्ष राहून कारवाई केली जात असतानाच दादर पोलीस मात्र या कारवाईत दक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाई ही केवळ शिवाजीपार्क पोलिसांच्यावतीने मोठ्याप्रमाणात केली जात असून ही कारवाई सुध्दा रानडे मार्गावरच अधिक प्रमाणात केली जाते. परंतु याच पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डिसिल्वा रोडवर आणि दादर पोलिसांच्या हद्दीतील जावळे मार्गावरील फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारे कडक कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतरही या निर्देशाचे पालन आजपावेतो होत नसून फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचे केवळ नाटक आता महापालिकेसह पोलिसांच्या मदतीने केली जात आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरांमध्ये शिवाजीपार्क आणि दादर पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचे केवळ नाटक केले जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाजीपार्क पोलिसांच्या हद्दीमध्ये रानडे मार्ग, छबिलदास गल्ली आणि डिसिल्व्हा रोड हा दादर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत आहे.
(हेही वाचा – याच साठी केला होता का अट्टाहास? महाराष्ट्र दिनीच संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन बंद)
शिवाजीपार्क पोलिसांच्यावतीने होणाऱ्या कारवाईमध्ये रानडे मार्गालाच प्राधान्य दिले जात असून रानडे मार्गाला जोडणाऱ्या छबिलदास गल्लीपासून ते पोस्ट ऑफिसपर्यंत ही कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या परिसरात पोलिसांकडून कारवाई न करता दीडशे मीटरच्या बाहेरही केली जात आहे. पोलिसांच्या वतीने धाक निर्माण केला जात असला तरी प्रत्यक्षात दोन पोलिस ठाण्याच्यावतीने कारवाईत होणारी विसंगती ही फेरीवाल्यांच्या मनात संशय निर्माण करत आहे. शिवाजीपार्क पोलिसांच्यावतीने ज्याप्रकारे रानडे मार्गावर कारवाई करत असले तरी डिसिल्व्हा रोडवर करताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्यावतीने होणाऱ्या कारवाईतही दुटप्पी भूमिका असल्याने फेरीवाल्यांवरील कारवाई नक्की कर्तव्यभावनेने केली जाते की त्यांच्या मनात भीती आणि धाक निर्माण करण्यासाठी केली जाते असा सवाल फेरीवाल्यांकडून केली जात आहे. फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी जर कारवाई करत असतील तर त्यांनी प्रथम रेल्वे स्थानकाच्या दीडेश मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर करायला हवी. परंतु त्यांना मोकळे सोडायचे आणि इतर फेरीवाल्यांवर कारवाई करायचे हे योग्य नाही. जर या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असेल अर्ध्यांना सोडायचे आणि अर्ध्यांवर कारवाई करायचे हे धोरण योग्य नसून यामुळे पोलिस महापालिकेच्या कारवाईबाबत शंका उपस्थित होते,असे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community