राज्यात परीक्षा आणि पेपर फुटीचे सत्र कायम आहे. दरम्यान, टीईटी पेपर फुटी प्रकरणांसोबत आता आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय शाहूराव सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने एकच खळबळीचं वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यात या पेपर फुटी प्रकरणी यापूर्वीच कारवाई करण्यात आली होती. तेव्हा ८ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संजय सानप यांची पुण्यातील सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. असेही सांगितले जात आहे की, संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय सानप बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच असून बीड शहरात वास्तव्यास आहे. त्याचा मोठा बंगला आहे. संजय सानपच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक
दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासून टीईटीच्या परिक्षेतील हे गैरप्रकार सुरु होते, असे आता स्पष्ट झाले आहे. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे. यातील पहिली अटक जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची आहे. तर दुसरी महत्त्वाची अटक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची आहे. संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून डेरेंना पोलिसांनी अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community