मुंबईत गोवंडीपाठोपाठ गोवरचे रुग्ण वाढत असलेल्या कुर्ल्यात आता पहिला गोवरबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कुर्ल्यातील ४ वर्षांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचा संशय पालिका आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ताप आल्यानंतर आठवड्याभरात मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गोवंडीखालोखाल सर्वात जास्त गोवरचे मृत्यू कुर्ल्यात दिसून येत आहेत.
नेमकी घटना काय
१ डिसेंबरला मुलीला ताप आला होता. तीन दिवसानंतर मुलीच्या चेह-यावर आणि संपूर्ण चेह-यावर पूरळ पसरले. मुलीच्या शरीरावर पुरळ दिसून आल्यानंतर दोन दिवसांनी तिच्या पालकांनी तिला पालिका रुग्णालयात दाखल केले. मुलीची तब्येत खालावल्याने ८ तारखेला तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र दुस-याच दिवशी तिचा मृत्यू झाला. मुलीला पोटाच्या विकारासह, कुपोषणाचाही त्रास होता. छातीत न्यूमोनिया तसेच गोवर या आजारांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली. मात्र मृत्यू अहवाल समितीच्या अंतिम माहितीनंतर मुलीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणासाठी झाला, याची कल्पना येईल अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
(हेही वाचा – गोवरचे रुग्ण नऊशेपार, संशयित रुग्ण संख्येत वाढ)
मुंबईत गोवरचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत ४४७ रुग्णांना गोवरची लागण झाली आहे. त्यापैकी १५ जणांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी ३ मृत्यू मुंबईबाहेरील तर ४ संशयित गोवर मृत्यू आहेत. सध्या एका रुग्णाची तब्येत गंभीर असून, तो व्हेटिंलेटरवर असल्याचे पालिका आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community