पुढील दोन दिवस मुंबईत अंगाची होणार लाहीलाही!

ढगाळ वातावरणाच्या आच्छादनात काही दिवस मुंबईत मे महिन्याच्या सुरुवातीचे दिवस जरासे बरे जात असताना घामाच्या धारांसह आता कमाल तापमानवाढही मुंबईकरांना त्रास देणार आहे. मुंबईत विकेण्डच्या सुरुवातीला कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

कमाल तापमान एका अंशाने वाढणार

दुपारच्या रखरखत्या उन्हात बाहेर पडताना घामाच्या धारांची आंघोळ होत असल्याचा अनुभव मुंबईकरांसाठी आता रोजचाच झाला आहे. शहरात ७४ टक्के आणि उपनगरांत ८० टक्के आर्द्रता नोंदवली जात आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान घराबाहेर जाणे अवघड होऊन बसले आहे. मुंबईतल्या सध्या आकाश निरभ्र असल्याने दुपारची घराबाहेर पडण्याची वेळ अजूनच अवघड होऊन बसली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटाला ३४ अंशापर्यंत खाली उतरलेले कमाल तापमान आता एका अंशाने वाढण्याची शक्यता वेधशाळेच्या अधिका-यांनी वर्तवली. मुंबईत आज कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(हेही वाचा – मान्सून यंदा १० दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज)

तीन वर्षांतील मे महिन्याच्या कमाल तापमानाचा रॅकोर्ड ब्रेक

उद्या शनिवारी कमाल तापमानात अजून एका अंशाने वाढ होत ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास गेल्या तीन वर्षांतील मे महिन्याच्या कमाल तापमानाचा रॅकोर्ड मोडला जाईल. याआधी  मे महिन्यात मुंबईत कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २६ अंशावर अपेक्षित असते. मे महिन्याचा पहिला आठवडा सरल्यानंतर मुंबईत आता कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here