-
प्रा. सुरेश चोपणे
गेल्या दशकापासून पृथ्वीवर तापमान वाढ आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत सतत वाढ होत आहे. भारत सुद्धा या घटनांना सामोरे जात आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना सहज पडणारा प्रश्न म्हणजे हा की, हे तापमान का वाढत आहे? आपण गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा इतिहास पाहिला, तर हे लक्षात येते की, महाराष्ट्र हा उष्ण कटीबंधात येतो आणि यातील विदर्भ हा अत्याधिक तापमान वाढीचा प्रदेश आहे. आपण इंग्रज काळातील तापमान पाहिले, तरी ते ४६ डि.से आढळते. अलीकडील वर्षात संपूर्ण भारत हा तापमानवाढ आणि उष्ण लहरीच्या चपाट्यात सापडला आहे, उत्तर भारत असो की, दक्षिण आणि मुंबईसारख्या समुद्र किनारी वसलेल्या शहरांचे तापमानसुद्धा वाढले असून तिथेही उष्ण लहरींचा इशारा दिला जात आहे. २०२२ वर्षात मागील १०० वर्षांत सर्वाधिक उष्ण लहरी आलेल्या होत्या. २०२३ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते, २०२४ हे त्याहीपेक्षा उष्ण वर्ष ठरले, याचप्रमाणे २०२५ हे सुद्धा अत्याधिक तापमानाचे वर्ष ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर पुढील वर्षे सुद्धा याच क्रमाने उष्ण ठरणार आहेत, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. २०२४ मध्ये ३ महिन्यांत तापमान १.५ डिग्री सेल्सियस या मर्यादेपर्यंत पोहोचले आहे. २०५० पर्यंत वाढणारे तापमान २०३० पर्यंतच वाढण्याची शक्यता आहे. (Heatwave)
(हेही वाचा – Crime : गुंड जियाउद्दीन अन्सारीचा वाढदिवसाच्या दिवशी मग्रुरपणा; पोलिसांनी शिकवला धडा)
तापमान का वाढत आहे?
तापमानवाढीला काही प्रमाणात नैसर्गिक, भौगोलिक आणि बहुतेक मानवनिर्मित कारणे आहेत. ज्वालामुखी उद्रेक आणि सूर्यावरील विस्फोट हे काही प्रमाणात पृथ्वीवर ऊर्जावाढ करीत असतात आणि वाढलेली ऊर्जा समुद्रात साठविली जाते. प्रदूषणामुळे वाढलेल्या कर्बवायूचे प्रमाण ३०० पासून ४२५ पीपीएम एवढे वाढले आहे. हा कर्बवायू सूर्याची उष्णता जमिनीवर साठवून ठेवतो, याला हरित गृहाचा परिणाम म्हणतात. जंगलतोड, शहरीकरण, औद्योगीकरण आणि प्रदूषण हेच वाढत्या तापमानाला आणि हवामान बदलाला कारणीभूत आहे. कारण यामुळे जमिनीचे तापमान वाढले आणि तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हवामान बदलाला आजची मानवी संस्कृती कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या वर्षी निनो किंवा अल निनोचा प्रभाव नाही. ला-निनोमध्ये तापमान कमी, तर अल निनोमध्ये तापमान वाढते. कुठलाही प्रभाव नसला, तरी या वर्षी तापमानाचा प्रभाव मात्र राहणार आहे. तापमानाची ऊर्जा वाऱ्यांच्या माध्यमाने इकडून तिकडे पाठविली जाते. जेट वारे हे भूमध्य समुद्री प्रदेशातून भारतात प्रवेश करतात. हे वारे पश्चिमी वीक्शोभ नावाने प्रसिद्ध आहेत. हे वारे ज्या प्रमाणे बाष्पयुक्त वारे आणतात, त्याचप्रमाणे उष्ण वारे सुद्धा उत्तरेकडील क्षेत्रात आणतात. अशा वेळेस उष्ण लहरी तयार होतात. हे उष्ण वारे राजस्थान, गुजरातकडून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात प्रवेश करतात आणि विदर्भातील तापमान सरासरीच्या ४ ते ५ डिग्रीने वाढते. या घटनात अलीकडील वर्षात वाढ होऊ लागली आहे. (Heatwave)
या तापमान वाढीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस वाढला, अतिपाऊस वाढला, त्यामुळे शेती पिकेनाशी झाली. उद्योगांचे सुद्धा यामुळे नुकसान झाले; कारण वादळी वारे, पूर अशा विविध संकटांमुळे इमारतीचे नुकसान, कामगारांची अनुपस्थिती आणि कामाचे तास कमी होते. अति पावसामुळे रस्ते, रेल्वे, पूल अशा मुलभूत सुविधांचे नुकसान होत आहे. ह्यातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. इतकेच नव्हे, तर देशाच्या नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आलेले आहे. तापमानवाढीमुळे विविध संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. सर्व ऋतू हे उष्ण झाले आहे, त्यामुळे कोरोनासारख्या विषाणूंचे प्रमाण वाढले आहे. त्यातून सतत महामारीचा धोका, सर्दी-खोकला हा वाढू लागला आहे. (Heatwave)
(हेही वाचा – Aseem Foundation : सिमरी गाव सौरऊर्जेने झाले प्रकाशमय; हुतात्मा जवानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला प्रकल्प)
२०२५ कसे असेल?
२०२५ हे वर्ष मागील सर्व वर्षांपेक्षा उष्ण वर्ष ठरणार असल्याचा अंदाज बहुतेक हवामान अभ्यासकांनी आणि संशोधन संस्थांनी दिला होता. त्याप्रमाणेच मार्च महिन्यात तापमान वाढले आणि गेल्या १०० वर्षातील अति उष्णतेचे मार्च हे तिसरे वर्ष ठरले. या महिन्यात आधीच २ उष्ण लहरी येऊन गेल्या आहेत आणि तापमान ४२ डि.से.पर्यंत गेले होते. एप्रिल महिना हा सुद्धा उष्णतेचा आणि उष्ण लहरीचा राहणार आहे. या महिन्यात सुद्धा सुरुवातीलाच उष्ण लहर आलेली असून तापमान अकोला येथे ४४ डि. से. पर्यंत गेलेले आहे. महिना अखेर एप्रिलचे तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या खाडीत, मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस सुद्धा होत आहे; परंतु उत्तर आणि मध्य भारतात तापमान वाढून ते ४६ पर्यत जाईल. मे महिना सुद्धा याच पद्धतीने तापमान वाढीचा असेल. वादळी पाऊस येत असला, तरी मे महिन्यात कमीतकमी दोन उष्ण लहरींचा प्रभाव राहील. या महिन्यात तापमान ४६ ते ४७ डिग्री सेल्सियसपर्यत जाईल. (Heatwave)
(लेखक पर्यावरण आणि हवामान अभ्यासक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community