मुंबईत सायंकाळनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हळूहळू पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ‘आरे’लगतच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना सोमवारी, ११ जुलै रोजी घरी परतत असताना पावसाची सोबत मिळाली. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईतील सर्व भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. हा पाऊस मध्यरात्रीही कायम राहिल्यास मंगळवारी, १२ जुलै रोजी सकाळी लोकलसेवा विस्कळीत होणार आहे, त्यामुळे नोकरदार वर्गाला कार्यालयात उशिरा पोहचावे लागणार आहे.
पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर
गेल्या सहा तासांत पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर सुरु आहे. दहिसर अग्निशमन केंद्रात २३.६ मिमी, बोरिवलीतील प्रबोधनकार नाट्य मंदिरात २२.८३, कांदिवलीत २२.२३, मालाड अग्निशमन केंद्रात २१.६, दिंडोशी अग्निशमन केंद्रात २२.९ अंधेरीत २१.८४, मरोळ अग्निशमन केंद्रात २०.२१ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी सहानंतर उपनगरांतही पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. मुलुंड अग्निशमन केंद्रात ४७.५ मिमी, गव्हाणपाडा अग्निशमन केंद्रात ४६.२१ पावसाची नोंद झाली. त्यानंतर संपूर्ण मुंबईत पावसाचा जोर सुरु झाला. मुंबईत मंगळवारपर्यंत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचेही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्यावतीने सांगितले आहे.
(हेही वाचा शिवसेनेचे ४१ आमदार फडणवीसांना ‘भेटले’, आता ११ खासदार शहांना ‘भेटले’)
Join Our WhatsApp Community