मुंबईत पावसाचे पुनरागमन होताच अतिवृष्टीचा इशारा

गेल्या आठवड्यात पुनरागमन झालेल्या पावसाने रविवारी, 7 आॅगस्ट रोजी मैत्रीदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग नोंदवला. दिवसभरात मुंबईतील बहुतांश भागात सहा तासांत 20 ते 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे छत्री आणि रेनकोटसह शिवाजी पार्क, पवई तलाव आदी परिसरात तरुणाई मैत्रीदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये गुंतली होती. संततधारेत कोसळणाऱ्या  पावसाचा सोमवार, 8 आॅगस्टपासून जोर वाढणार आहे. मुंबईत सोमवारपासून तीन दिवस तर पालघर ठाण्यात सोमवारपासून सलग चार दिवस अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

सर्वात जास्त पाऊस मुलुंडमध्ये झाला

सकाळी अकराच्या सुमारास मुंबईत हलक्या पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबईत मात्र दिवसभर पावसाचे शिडकावे सुरु होते. मध्य मुंबईत आणि पश्चिम उपनगरात पावसाळी वातावरण होते. देवनार, चेंबूर, विद्याविहार, अंधेरी, भांडुप, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली परिसरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. सर्वात जास्त पाऊस मुलुंडमध्ये झाला. गेल्या सहा तासांत मुलुंडच्या गव्हाणपाडा अग्निशमन केंद्रात 35.05 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याखालोखाल मालाड अग्निशमन केंद्रात 31.99 मिमी पाऊस झाला. कांदिवली अग्निशमन केंद्रात 30.2 मिमी पावसाची नोंद झाली.
घामाच्या धारांना ब्रेक
पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर उन्हाच्या झळापासून ब्रेक मिळाला. मुंबईतील दोन्ही वेधशाळा स्थानकात आद्रता मात्र 93 टक्के नोंदवली गेली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here