दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती, बुधवारपासून होणार अंमलबजावणी

मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी मोटार सायकलस्वारासह मागे बसणारा प्रवासी (पिलियन रायडर) याला हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या हेल्मेटसक्तीची अंमलबाजवणी बुधवारपासून, ८ जुन २०२२ पासून करण्यात येणार आहे. पिलियन रायडरने हेल्मेट घातलेले नसल्यास त्याचा दंड मोटार सायकलस्वाराला बसणार आहे. त्याच बरोबर त्याचा वाहन परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. आम्ही नियम काढलेला आहे तर त्याची अंमलबजावणी होणारच, आदेश जारी करण्यात आलेले आहेत, त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी, ६ जून २०२२ रोजी सांगितले.

परिपत्रक काढले 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने २५ मे रोजी एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकात मोटार सायकलस्वारासह मागे बसणाऱ्या पिलियन रायडर यांना हेल्मेटसक्तीचा आदेश काढण्यात आला होता. परिपत्रक काढल्याच्या तारखेपासून १५ दिवसांनी या आदेशाची अंमलबजावणी मुंबईत करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले होते. वाहतूक पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकानुसार बुधवारी हेल्मेटसक्तीवर अमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त यांनी  सोमवारी पत्रकारांशी चर्चा करताना  पिलियन रायडरला हेल्मेटसक्तीत कुठलाही बदल करण्यात आलेला नसून हेल्मेटसक्ती लागू होणारच आहे असे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले आहे. मंगळवारी मुंबईतील रस्त्यावर वाहतूक विभागाकडून विनाहेल्मेट मोटार सायकलवर बसणाऱ्या पिलियन रायडरवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा अंतर्गत विनाहेल्मेट वाहन चालविणारे तसेच विनाहेल्मेट पिलियन रायडरला प्रत्येकी  ५०० रुपये दंड तसेच मोटर सायकलस्वाराचा वाहन परवाना ३ महिन्यासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here