प्रसूतीपूर्व लिंग निदानासाठी होणाऱ्या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (विनिमय व दुरुपयोग) प्रतिबंध कायदा १९९४ लागू करण्यात आला. प्रसूतीपूर्व लिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या करणे हे स्त्रियांची अस्मिता व त्यांचा समाजातील दर्जा यास हानिकारक आहे. त्यासाठी असे गैरप्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी हा कायदा लागू केला आहे. मात्र कायदा लागू करण्यात आला असला तरी राज्यात अद्याप स्त्री भ्रूणहत्येत वाढ होताना दिसत आहे. तर लिंग गुणोत्तरामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत पुरोगामी महाराष्ट्र २७ व्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे.
पुरोगामी महाराष्ट्र कितव्या स्थानावर?
२०१९ मध्ये २०१८ च्या तुलनेत दर हजारी मुलींच्या प्रमाणात बीड ८७, वाशिम ५३, हिंगोली ४१ ने घट झाली आहे. तर जालनात लिंग गुणोत्तरात सर्वांत वाढ झाली असून हे प्रमाण १४३ ने वाढले आहे. त्याचबरोबर गोंदिया ९२, गडचिरोलीत ४६ने वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील स्त्री-भूणहत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक वर्षे मोहीम राबविण्यात येत असली तरी यात १०० टक्के यश आले अशी स्थिती नाही. जिल्ह्यात दरमहा जन्मणाऱ्या नवजात बालकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे जन्माचे प्रमाण घटण्याचा सिलसिला कायम आहे. गेल्या वर्षभरात जन्मलेल्या बालकांमध्ये मुलांपेक्षा २०८ एवढ्या मुली कमी जन्मल्याचे आकडे सांगतात.
(हेही वाचा – “मविआ म्हणजे खाऊंगा भी, और…”, अमृता फडणवीसांची खरपूस टीका)
२१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढ
२००१ मध्ये राज्याचे लिंग गुणोत्तर ९१३ इतके होते. त्यामध्ये वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार घट होऊन ८९४ इतके कमी झाले. राज्यात सप्टेंबर २०२१ अखेरीस १०,१५६ सोनोग्राफी केंद्रांची कायद्यांतर्गत नोंदणी झाली. या कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध एकूण ६०७ न्यायालयीन प्रकरणे वर्ष २०२०-२१ पर्यंत दाखल करण्यात आली आहेत, समर्थन अध्ययन केंद्राच्या अभ्यास अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्याचे २०१९ मध्ये लिंग गुणोत्तर ९१९ असल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे २०१८ च्या तुलनेत २०१९ साली राज्यात लिंग गुणोत्तरच्या प्रमाणात तीनने वाढ झाली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांत मुलींची संख्या घटली, तर दिलासादायक बाब म्हणजे २१ जिल्ह्यांत मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community