नियंत्रण कक्षाकडून ब्लॉक करण्यात येणाऱ्या क्रमांकाचा ब्लॉक कॉलर कसा असतो याचे ताजे उदाहरण म्हणजे ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईवरून दिसून येते. ना.म. जोशी मार्ग येथे पोलिसांनी एका उच्चशिक्षित इसमाला अटक केली आहे. हा इसम अनेक दूतावासांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. पोलिसांनी या इसमाच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले असता मागील २० ते २५ दिवसात त्याने मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर सुमारे सव्वाशे कॉल केल्याचे समोर आले. नियंत्रण कक्षाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती मिळवली असता हा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धाचे भारतात पडसाद! कशावर झाला परिणाम? )
लोअर परळ येथे असणाऱ्या एका दूतावास कार्यालयाच्या फोनवर तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून इंग्रजी भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त परमसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, निखिल शेळके यांचे पथक या कॉलरचा शोध घेण्यासाठी गठीत केले होते.
आरोपीला घेतले ताब्यात
या पथकाने दूतावास कार्यालयात धमकीचा कॉल करणाऱ्या या आरोपीचा तांत्रिक पध्दतीने शोध घेऊन खार १६ वा रस्ता येथून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेला इसम हा ३८ वर्षाचा असून मूळचा हरियाणा गुडगाव येथे राहणारा उच्च शिक्षित आहे. त्याचे वडील रिटायर्ड कर्नल असून आई बिझनेस वुमन आहे. एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याचे बहुतांश शिक्षण परदेशात झालेले आहे. व तो परदेशातच राहत होता. कोविडच्या काळात तो परदेशातून भारतात आला त्यावेळी त्याचे काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडले होते. हरियाणा, दिल्ली येथे काही दिवस राहिल्यानंतर तो दीड ते दोन महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर तो स्वतःच्या गाडीतच राहत व झोपतच होता. त्याला पुन्हा परदेशात जायचे असल्यामुळे त्याने व्हिसा मिळावा म्हणून अनेक वेगवेगळ्या देशातील दुतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता.
(हेही वाचा फ्रान्सने रशियाला ‘ही’ दिली भयंकर धमकी, ज्यामुळे जगाची उडाली झोप…)
रिहाब सेंटरमध्ये रवानगी
अटक करण्यात आलेला आरोपी हा नेहमी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्ष, विविध दूतावास या ठिकाणी फोन करून त्रास देत होता. मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून तो विचित्र प्रश्न विचारत असे, कधी अश्लील भाषा वापरत होता. त्याच्या क्रमांकावरून सतत कॉल येऊ लागल्यामुळे तसेच विनाकारण कॉल करीत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने या त्रासदायक मोबाईल क्रमांकाला ब्लॉक केले होते. त्याचा क्रमांक ब्लॉक लिस्ट मध्ये टाकल्यानंतर त्याचे १०० क्रमांकावर कॉल येणे बंद झाले आहे.
ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या या इसमाच्या कुटुंबासोबत संपर्क साधून त्यांना त्याच्या अटकेची कल्पना देण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी देत जामीन मंजूर केला. दरम्यान या इसमाला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर आई वडिलांनी त्याची रवानगी नवी मुंबईतील रिहाब सेंटर येथे केली आहे.