गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाब संदर्भात वाद सुरू होते. त्यानंतर कर्नाटकातील उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आणि हिजाब हा इस्लामिक धर्माचा अनिवार्य भाग नसल्याचे सांगितले आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णतः हिजाब बंदी योग्यच असल्याचे न्यायालयाने म्हटले असताना विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्राध्यापिकेला न्यायालयाचा हा निर्णयच मान्य नसल्याचे समोर आले आहे.
मुस्लिम प्राध्यापिकेने काय म्हटले राजीनाम्यात?
विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्राध्यापिकेने कॉलेजच्या वातावरणाला कंटाळून राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. प्राध्यापिकेच्या राजीनाम्याचा संबंध कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी लावला जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांनी राजीनामा देताना मला माझं कर्तव्य बजावत असताना त्रास होत आहे. अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागतोय, असे या प्राध्यापिकेने राजीनाम्यात म्हटले आहे.
कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून सर्व आरोप फेटाळले
हा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या विरारमध्ये सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. प्राध्यापिकेच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या विरारमध्ये आहे. या प्रकरणासंबंधीत विवा कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून हे सर्व आरोप फेटाळून लावले. कर्नाटक हिजाब प्रकरणाचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापकाने केलाय. या सर्व प्रकरणात राजीनामा देणारी मुस्लिम प्राध्यापिका अद्याप समोर आलेली नाही. त्याचबरोबर आपली प्रतिक्रिया किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची प्रत्यक्ष वाच्यता कुठेच केली नसल्याचे वृत्त आहे.
(हेही वाचा – बापरे! साखर 290 रूपये तर तांदूळ 500 रुपये किलो)
काय म्हणाले विवा कॉलेजचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर?
35 वर्ष ही संस्था सुरू आहे, त्यामुळे अशी तक्रार कोणीही केली नसून या प्रकरणात विवा समूह कॉलेजचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र हे सर्व प्रकार चुकीचे असून, प्राध्यापिकेने वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ते असेही म्हणाले की, माझ्या संस्थेत जेवढे मुस्लिम कर्मचारी असतील. तेवढे मुस्लिम कर्मचारी दुसऱ्या कुठल्याही संस्थेत सुद्धा नसतील. 3 ते 4 वर्षे एखादी महिला आपल्या पदावर कार्यरत असताना तिला कोणताही त्रास होत नाही. पण अचानक हिजाब प्रकरणानंतर कोणता त्रास निर्माण झाला असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.