100 टक्के नागरिकांना लसीचा ‘पहिला’ डोस देणारे ‘हे’ आहे देशातील पहिले राज्य

130

देशभरात कोविड-19 लसीकरणाला वेग आला आहे. त्यासाठी केंद्र सरकार सोबतच सर्व राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत. लसीकरणाच्या बाबतीत हिमाचल प्रदेश राज्याने नवा विक्रम केल्याची माहिती मिळत आहे. कोविड-19 लसीचा पहिला डोस राज्यातील 100 टक्के पात्र लोकसंख्येला देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

लवकरच राज्य पूर्ण लसवंत करणार 

हिमाचल प्रदेशने लसीकरणात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजीव सैजल यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. लसीकरणामध्ये राज्य सरकारची कामगिरी चांगली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन, राज्य 100 टक्के लसवंत करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अशी आहे आकडेवारी

29 ऑगस्ट 2021 पर्यंत हिमाचल प्रदेशची लोकसंख्या 54 लाख 66 हजार 292 इतकी नोंदवण्यात आली होती. जनगणनेनुसार यापैकी 53 लाख 77 हजार लोकसंख्या 18 वर्षांवरील असून, त्याबाबतचा डेटा आरोग्य विभागाला देण्यात आला. त्यानुसार या पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जे लोक लसीकरण मोहिमेपासून वंचित राहिले आहेत, त्यांना लवकरात लवकर लस देण्यात येईल असेही आरोग्यमंत्री सैजल यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

हिमाचल प्रदेशने लसीकरणाच्या बाबतीत केलेल्या या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांच्या उत्तम कामगिरीमुळे हिमाचल प्रदेशने हा टप्पा गाठला आहे. राज्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण यश आहे, अशा शब्दांत ट्वीट करत मनसुख मांडवीय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सक्षम आरोग्य यंत्रणा

डोंगराळ भाग असल्याने राज्याच्या कानाकोप-यात लसींचा पुरवठा करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु लसींचा पुरेसा पुरवठा आणि सक्षम आरोग्य यंत्रणा यांच्या जोरावर आपण हा टप्पा गाठू शकलो, असेही राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. त्याचप्रमाणे लोकांनीही या मोहिमेस उत्तम पाठींबा दिल्याने लसीकरण मोहिमेला आणखी वेग आल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

देशात किती झाले लसीकरण?

देशात आतापर्यंत 64 करोड 47 लाख पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, यापैकी 49 करोड 70 लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 14 करोड 77 लाख नागरिक पूर्ण लसवंत झाले आहेत.

महाराष्ट्रात किती लसवंत?

महाराष्ट्रात 30 ऑगस्टपर्यंत एकूण 5 करोड 85 लाख 81 हजार 476 पात्र नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. यापैकी 4 करोड 26 लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस तर 1 करोड 58 लाख नागरिकांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.