‘हिंदुस्थान पोस्ट’ इम्पॅक्ट! अखेर ‘हुतात्मा स्मारक चौक’ नावाचे लागले नवे फलक

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल

222

तब्बल पाच वर्षांपूर्वी फोर्ट येथील हुतात्मा चौक चे नाव सुधारीत करून ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे करण्याचा महापालिकेत ठराव मंजूर होऊनही या सुधारित नावाच्या पाट्या हुतात्मा स्मारक चौकात लावल्या गेल्या नव्हत्या, परंतु हा मुद्दा ‘हिंदुस्थान पोस्ट’ने लावून धरल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना दखल घ्यावी लागली. त्यानंतर सुत्रे हलली आणि हुतात्मा चौक परिसरात सुधारीत नावाच्या ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नामफलक लागले गेले.

पुन्हा नामकरण करण्याची मागणी

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढयात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाऊंटन आताचे हुतात्मा चौक परिसरात प्रथम १४ जणांनी प्राणाची आहुती दिली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढा पेटता राहिला. १६ जानेवारी ते ३ जून १९५६ पर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात ९३ हुतात्मे झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एकूण १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जेथे प्रथम रक्त सांडले, त्या जागी २१ नोव्हेंबर १९६१ साली “हुतात्मा स्मारक “उभारण्यात आले. हे “हुतात्मा स्मारक ‘महाराष्ट्राची अस्मिता, शिवाय संयुक्त महाराष्ट्र लढयाचा इतिहास जागविणारे प्रेरणास्थान आहे.  “हुतात्मा स्मारक”उभारल्यानंतर फ्लोरा फाऊंटनच्या या चौकाला हुतात्मा चौक “नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने २९ एप्रिल १९६३ रोजी मंजूर केला. हुतात्मा चौक नावाचा वापर सुरु झाला. परंतु मुंबई संयुक्त महाराष्ट्र लढयातील हुतात्म्यांची स्मृती जागविणारे हुतात्मा स्मारक आहे. त्यामुळे हुतात्मा चौक ऐवजी हुतात्मा स्मारक चौक असे पुन्हा नामकरण करण्याची मागणी तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर, तत्कालीन सभागृह नेत्या आदींकडे संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली होती.

(हेही वाचा – हुतात्मा चौक की हुतात्मा स्मारक चौक! सत्ताधारी सेनेचं लक्ष कुठे?)

हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल

त्यानंतर भाई सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी महापालिकेचा प्रस्ताव रेओपन करत महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला. या सुचनेनुसार मुंबई महापालिका सभागृहात ८ मे २०१७ रोजी सुधारित ठराव मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्राय साठी पाठवण्यात आला. परंतु साडेचार वर्षे उलटून गेल्यानंतरही या ठरावानुसार हुतात्मा चौकात ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे फलक लावले गेले नव्हते. परंतु हुतात्मा स्मारकाच्या उभारणीला साठ वर्षे पूर्ण होत असल्याने या हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना या हुतात्मा चौकाचे नामकरण हुतात्मा स्मारक चौक असे करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत मंजूर ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी भाऊ सावंत यांचा पत्रव्यवहार सुरु असला तरी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केला जात होता.

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल

परंतु याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली. या वृत्ताची दखल खुद्द राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून घेतली आणि त्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना  निर्देश देत याबाबतचा फलक लावण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची माहिती घेत त्वरीत ए विभागाला सुधारीत नामकरणाचा फलक लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मागील आठवड्यात हुतात्मा स्मारक चौक असे फलक लावण्यात आले आहे. महापालिकेच्या ए विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त शिवदास गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील आठवड्यात फोर्ट परिसरातील हुतात्मा चौकात सुधारीत हुतात्मा स्मारक चौक या नावाचे फलक लावण्यात आल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.