विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याच्या समर्थनात सोशल मीडियावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु अफवांना बळी पडू नका, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर संदेशामार्फत केले आहे. जोपर्यंत मी स्वतः कुठलाही व्हिडिओ अथवा मेसेज टाकत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कुठलेही आंदोलन अथवा एकत्र येऊन कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये, अशी विनंती हिंदुस्थानी भाऊ याने वकिलांमार्फत केली आहे.
पोलिसांचे आवाहन
विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला अटक केल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ, ऑडिओच्या माध्यमातून हिंदुस्थानी भाऊच्या समर्थानात धारावीत एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. धारावी पोलिसांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी तसेच परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला असून धारावीत येणारे सर्व रस्त्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या प्रकारचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून माग काढला जात आहे. तसेच धारावी पोलिसांकडून विद्यार्थी आणि पालकांसाठी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यात येत आहे, पोलिसांच्या मेसेजमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या संदेश अथवा व्हिडिओ, अफवांवर विश्वास ठेवू नका. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, आपले भवितव्य आपल्या हाती आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आता व्हिडिओ गेमसारखी गाडी चालवून मिळवता येणार वाहन परवाना )
हिंदुस्थानी भाऊचा वकिलामार्फत मेसेज
दरम्यान अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊ याने वकिलामार्फत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे. त्यात वकिलांनी ‘मी हिंदुस्थानी भाऊला भेटून आलो आहे, भाऊंनी सर्वांना विनंती केली आहे की, मी जोपर्यंत स्वतः कुठला व्हिडिओ अथवा मेसेज सोशल मीडियावर टाकत नाही, तोपर्यंत कुठल्याही दुसऱ्या व्हिडिओला अथवा मेसेजला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा गर्दी करू नये,’ अशी विनंती भाऊकडून करण्यात आली असल्याची माहिती वकील महेश मुळ्ये यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community