वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळेला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी आरोपी विक्की उर्फ विकेशला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. दरम्यान आज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरविले होते. गुरूवारी या प्रकरणी न्यायालयाने निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विकेश नगराळेने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालय काय निर्णय देणारं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. अंकिताचे आई-वडिल देखील न्यायायलात हजर होते.
मरेपर्यंत जन्मठेप- उज्ज्वल निकम
नराधम नगराळेला जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाल्यानंतर सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, आरोपीला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मरेपर्यंत जन्मठेप असा जन्मठेपेचा अर्थ होत असल्यामुळे आणि विकेश नगराळेच्या गुन्ह्याचं क्रौर्य पाहून त्याला 2 वर्षांची सूट मिळणार नाही. शिवाय त्याला 5हजारांचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – जामीन मिळताच नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणाले… )
काय आहे प्रकरण
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी 40 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी तिची प्राणज्योत मालवली. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे कृत्य केल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून तब्बल 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी एकूण 64 सुनावण्या होऊन 29 जणांची नोंदवण्यात आली होती. आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे हा रेल्वेत नोकरीला लागला होता. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. हिंगणघाटच्या अंकिता पिसुड्डे आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते.
Join Our WhatsApp Community